आ. मनोजदादा घोरपडे; सत्ताधार्यांचे पॅनेलच आमचे खरे टार्गेट
कराड/प्रतिनिधी : –
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा सत्ताधार्यांनी २५ वर्षे वापर केला. कारखान्यात घराणेशाही आणली. त्याच कारखान्याचा भावी चेअरमन एक शेतकरी असेल. तसेच या कारखान्याचे नामकरण आपण “आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्रि सहकारी साखर कारखाना” असे करू, अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
प्रचाराचा शुभारंभ : पाल (ता. कराड) येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्रि परिवर्तन पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जेष्ठ नेते वसंतराव जगदाळे, कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष निवासराव निकम, वासुदेव माने, बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष विजय कदम, कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, अधिकराव पाटील, नवनाथ पाटील, राहुल पाटील (पार्लेकर) यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.
आम्हाला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न : आम्हाला विरोधक समजणार्यांच्या डोक्यात आधीपासूनच पाप होते, असे सांगत आमदार घोरपडे म्हणाले, मोठी सभा घेऊन आम्हाला तोंडघशी पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, आम्ही 24 तास जनमानसात मिसळणारे आहोत. त्यामुळे आम्ही असू तिथे लोक आपसुकस येतात.
पी. डी. पाटील पॅनेलच आमचे टार्गेट : रडणार्या लोकांना आमचे टार्गेट पी. डी. पाटील पॅनल आहे, हे सांगायला हवे, असे सांगत श्री. घोरपडे म्हणाले, अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी बैठकीतून कोण उठून गेले, हे पहावे. आम्ही त्यांना आठ-नऊ जागा द्यायला तयार होतो. आम्ही तीन वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. मात्र, ते आमचीच बदनामी करतात. जर आम्हाला बदनाम करणार्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आमदाराप्रमाणे संचालकही बदलून द्या : सत्ताधार्यांचा समाचार घेताना आमदार घोरपडे म्हणाले, विधानसभेत आमदार बदलला, तसा कारखान्यात आम्हाला चेअरमन आणि संचालक मंडळ बदलून द्या. अशी शेतकरी, सभासदांची मागणी आहे. कारखान्यात बदल केल्याशिवाय त्यांचे जीवनमानात उंचावणार नाही.
कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करू : कारखान्यात गव्हाण व बगॅस शुगर वगळून अन्य कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करणार आहोत. 14 लाख मेट्रिक टनावरून आठ लाख मेट्रिक टनापर्यंत गळीत आणले. एक्सपांशन होईल तसे यांचे गळीत कमी कमी झाले असल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले.
…हा संकेत आहे : विधानसभेत वादळ आले, त्यावेळी कारखान्यावरचा पत्रा उडाला. या वादळाने त्यांची आमदारकी गेली. आता कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला आहे, आता कारखाना त्यांच्या हातून जाणार आहे. नियतीला ज्या गोष्टी मान्य असतात, त्या गोष्टी होत असतात. या घटनेने त्यांना संकेत दिले आहेत, असा खोचक टोलाही आमदार घोरपडे यांनी विद्यमान चेअरमन यांचे नाव न घेता लगावला.
सह्याद्रि दुकानदारी नव्हे, आमच्यासाठी सहकार मंदिर
सह्याद्रि कारखान्याची दुकानदारी मत्त्यापूरमधून चालवून देणार नाही, असे बोलणार्यांना कारखाना ही दुकानदारी वाटत असेल. पण आमच्यासाठी ते सहकार मंदिर आहे. तुमची दुकाने बंद पडणार असल्याने त्यांच्या पोटात दुखत असेल. त्यांच्यासोबत असणारी सर्व दुकानदारांची टीम आहे. नेतृत्व द्यायला हरकत नाही. पण ते त्या दर्जाचे असायला हवे, असा टोला आमदार घोरपडे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना लगावला.
…मग, त्यांचा मुलगा सभासद कसा झाला?
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष हे अलीकडच्या २०/२५ वर्षात नवीन सभासद केले नसल्याचे सांगत सुटले आहेत. पण त्यांचा तरुण मुलगा तर कारखान्याचा सभासद झाला आहे. मग त्यांनी त्यांच्या पोराला तो पोटात असतानाच सभासद केले होते काय? असा सवाल आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी केला.
आता मोफत साखर कशी परवडते?
मी संचालक असताना अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना कृष्णा कारखाना २ रुपये किलो दराने सभासदांना साखर देत आहे. आपणही देऊया अशी मागणी केली होती. त्यावेळी तुम्ही नवीन आहात असे त्यांनी मला सांगितले. पण आता मात्र हे सभासदांना मोफत साखर देण्याची घोषणा करतात ती कशी काय? असा सवाल माजी संचालक रमेश मोहिते यांनी यावेळी केला.
