आ. मनोजदादा घोरपडे; पालमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेब पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
कराड/प्रतिनिधी : –
पाणी प्रश्नावर कराड उत्तर मतदारसंघ गेल्या 35 वर्षांपासून झुलवत ठेवण्यात आला. परंतु, येत्या दोन वर्षांत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये पाणीप्रश्न शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
शब्द पाळला : पाल-इंदोली उपसा जलसिंचन योजनेला 50 मीटर वरुन 100 मीटर हेडची मंजुरी मिळाल्याशिवाय पाल-उंब्रज विभागात जाहीर सभा घेणार नाही, असा शब्द विधानसभेवेळी दिला होता. त्यामुळे पाल-इंदोली उपसायोजनेला 100 मीटर हेडची मंजुरी घेवूनच आज पालीच्या सभेत उभा राहिलो. आपण दिलेला शब्द पाळला असून पाणीप्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
प्रचाराचा शुभारंभ : पाल (ता. कराड) येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पाणी जिव्हाळ्याचा विषय : कराड उत्तरमधील पाणी प्रश्नावर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी लक्ष घातले. ते म्हणाले, पाणी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्यासाठी मतदारसंघातील लोकांना वणवण करावी लागणार नाही. त्यासाठी लागेल ते प्रयत्न करणार आहे. पाल-इंदोली उपसा सिंचन योजना पन्नास मीटर हेडची होती. त्यामुळे या भागाला पाणी मिळत नव्हते. शेती पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्यासाठी या परिसराला झुलवत ठेवण्यात आले. परंतु, याच खंडोबाच्या नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते, ते आश्वासन पाळले असल्याचे त्यांनी सांगितले.
100 मीटर हेडला मान्यता : दोनच दिवसांपूर्वी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बैठक करून पाल उपसा सिंचन योजनेला 100 मीटर हेडची मान्यता आणली आहे. लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचेही आमदार घोरपडे यांनी सांगितले.
हणबरवाडी-धनगरवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर : तसेच हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्याला निधी मंजूर करून आणला आहे. राजाची कुर्ले व शामगाव या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी टेंभूतून पाणी दिले आहे. गणेशवाडी समर्थ नगर उपसा सिंचन योजनेसाठी मंजुरी आणली असून गणेशवाडी योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या दोन वर्षांत कराड उत्तरमध्ये पाणी हा प्रश्न शिल्लक राहणार नाही, असा विश्वासही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला.
महिन्याभरात उंब्रजच्या उड्डाणपुलाचे टेंडर
उंब्रजच्या उड्डाणपुलासाठी सातत्याने मागणी होत होती. आमदार नसतानाही या उड्डाणपुलाला मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. उंब्रज परिसरातील लोकांनी जो पाठिंबा दिला. त्यामुळे उड्डाणपुलाचा प्रश्न आमदार झाल्यानंतर उचलून धरला. केंद्रीय स्तरावर यासाठी पाठपुरावा केला असून येत्या महिनाभरात उंब्रजला उड्डाणपूलाचे टेंडर निघून हा प्रश्न मार्गी लागेल व उंब्रज बाजारपेठेची निगडित असलेल्या अनेक गावांचा समस्या कायमची दूर होणार आहे, असे आ. घोरपडे यांनी सांगितले.
हणबरवाडी-धनगरवाडी योजनेसंदर्भात मंत्रालयात बैठक
विधान भवन मुंबई येथे दोनच दिवसांपुर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत आ. मनोजदादा घोरपडे यांची बैठक झाली. यामध्ये मसूर विभागातील हणबरवाडी-धनगरवाडी योजनेस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ना. मकरंद पाटील, आ. सचिन पाटील, आ. विश्वजीत कदम व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
