प्रा. शंकर आंबवडे; श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्याख्यान संपन्न
कराड/प्रतिनिधी : –
विविध धर्म, प्रांत, भाषा, वंश आदी बाबींमध्ये प्रचंड वैविध्य असतानाही भारतीय संविधानाने संपूर्ण देशाला एकत्र बांधण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. भारतातील समाजाला नवा चेहरा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधानाने केले, असे प्रतिपादन प्रा. शंकर आंबवडे यांनी केले.
मार्गदर्शन : श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘संविधानातील मानवी हक्क व अधिकार’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थिती : यावेळी प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख प्रा. संतोष पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. एनएसएस विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवी हक्कांचे जाणीव आवश्यक : “संविधानातील तिसऱ्या प्रकरणात कलम १४ ते ३५ दरम्यान भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार प्रदान करण्यात आल्याचे सांगत प्रा. आंबवडे म्हणाले, या हक्कांची जाणीव आणि जागृती प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. विविध राज्यांची भाषा, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली वेगळी असली तरीही समाजात एकतेची भावना टिकवून ठेवण्याचे कार्य संविधानाने यशस्वीपणे पार पाडले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकसंघतेबद्दल असलेली साशंकता संविधानामुळे पूर्णतः दूर झाली असून, संविधानाबद्दलचा आदर आणि गौरव दिवसेंदिवस वाढत आहे.
संविधानाबद्दल आपुलकी : कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष थोरात यांनी केले, तर आभार प्रा. अमिता माने यांनी मानले. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतांद्वारे संविधानाबद्दलची आपुलकी व्यक्त केली.
