शेतकरी कुटुंबातील जन्म, आई-वडिलांना हातभार, खडतर शालेय जीवन, संस्कार व आदर्शांची शिदोरी, ज्ञानदानाचा पवित्र यज्ञाचा आरंभ, संसारिक जीवनास सुरुवात, वृतस्थ आणि तत्वनिष्ठ शिक्षक म्हणून बहुमूल्य योगदान, सेवानिवृत्ती, शेतीकडे ओढा, अध्यात्माची कास, आरोग्य संकटांवर मात आणि शेवटच्या क्षणापर्यंत मुखात असलेले भगवंताचे नामस्मरण असा संघर्षमय आणि तितकाच सुखी, समाधानी जीवनप्रवास असलेले विवेक वेळापूरे, सचिन वेळापूरे व संध्या (भगिनी) या आम्हा भावंडांचे दैवत, आमचे पिताश्री कै. पद्मराज बापूराव वेळापुरे (गुरुजी) यांच्याबद्दल थोडेसे…
– विवेक पद्मराज वेळापूरे
– सचिन पद्मराज वेळापूरे

शेतकरी कुटुंबात जन्म : आमचे वडील पद्मराज बापूराव वेळापुरे (गुरुजी) एक वृतस्थ आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावातील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई-वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
आदर्श भावी पिढी घडवण्याचा ध्यास : आई-वडिलांच्या संस्कारांतून, त्यांच्या मार्गदर्शनातून आणि आध्यात्मिक जडणघडणीतून ते घडले. आपल्यावर झालेल्या आदर्श संस्कारांनुसार भावी पिढीही आदर्शवत घडवण्यासाठी स्वीकारलेल्या शिक्षकी पेशाला त्यांनी शेवटपर्यंत न्याय दिला.
पोस्टाचीवाडीपासून ज्ञानयज्ञास आरंभ : सुरवातीला पाच ते सहा घरांचे गाव असणाऱ्या कोकणातील पोस्टाचीवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना नियुक्ती मिळाल्यानंतर तेथे जाऊन अक्षरशः स्वतः मुले गोळा करून शिक्षणासाठी शाळेत आणली. त्याकाळी केवळ साठ रुपये मासिक पगारावर त्यांनी नोकरीचा श्रीगणेशा केला, ज्ञानदानाचा पवित्र यज्ञ उभारला.
शिक्षकी पेशाचा प्रवास : पोस्टाचीवाडीनंतर पुढे कोकाणातीलच कोलाड, महाड, त्यानंतर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि नंतर कराड तालुक्यातील नांदलापूर व कराड शहर असा त्यांचा शिक्षकी पेशाचा प्रवास राहिला. त्यानंतर सन 1991 मध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना ते सेवानिवृत्त झाले.
यथोचित मान, सन्मान : शिक्षण विभागासह प्रशासकीय पातळीवरही गुरुजींच्या शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. त्याबद्धल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते अनेकदा यथोचित मान, सन्मानही झाला.
शेतीत रममान : सेवानिवृत्तीनंतर कराड तालुक्यातील मूळ गावी रेठरे बुद्रुक येथे आल्यानंतर त्यांनी शेती व्यवसायात पुन्हा आपले मन रमवले. वडिलोपार्जित शेती कसण्यात त्यांना मनस्वी आनंद व्हायचा.
सेवानिवृत्तीनंतरही शासकीय योगदान : गुरुजींनी सेवानिवृत्तीनंतर पेन्शनर म्हणूनही अनेक शासकीय योजना, उपक्रमांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळी जनगणना अधिकारी, विद्यार्थी संस्कारासाठी कब बुलबुल पथकाचे संचालक, विविध शिक्षक अधिवेशनांचे अधिकारी म्हणूनही ते सक्रीय कार्यरत राहिले.
विश्वास रक्षक व संचयक : मी गुरुजींचा मोठा मुलगा विवेक सध्या श्री कालिकादेवी नागरी पतसंस्था मर्यादित, कराड येथे मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तसेच गुरुजींच्या आदर्शांनुसार वर्तमान व भविष्यकालीन आर्थिक जीवन संचयनाचा विश्वास रक्षक व संचयक म्हणून प्रामाणिकपणे व तितक्याच निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडत आहे. तर मुलगी शुभांगी (आमच्या भगिनी) सध्या नाशिक येथे पती व मुलांसह सुखी, समाधानी कौटुंबिक आयुष्य व्यथित करत आहेत.
ज्ञानदानाचा वारसदार : मी गुरुजींचा लहान मुलगा सचिन सिंहगड इन्स्टिट्यूट (पुणे) येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असून आपल्या वडिलांना आदर्श मानून त्यांचा ज्ञानदानाचा पवित्र वारसा पुढे चालवत आहे. गुरुजींप्रमाणेच वृतस्थ व तत्वनिष्ठ अध्यापनावर भर देत आहे.
रेशीमगाठी जुळविण्याचे पवित्र कार्य : गुरुजींनी समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून विविध जातीतील, समाजातील वधुवर मेळाव्यांच्या आयोजनांमध्ये भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती करीत जवळजवळ 100 हून अधिक विवाह जुळवून ते पार पाडले आहेत. त्यांचा स्नेह व त्यांच्या कार्याचा ठसा संपूर्ण कराड शहर व परिसर, तसेच विविध शिक्षण संस्था यांच्याशी निगडित राहिला आहे.
गुरूंच्या आदर्शांचे अनुकरण : शिक्षकी पेशाची नोकरी, विविध व्यवसाय आणि शेती सांभाळून देखील आध्यात्मिक प्रवासात ते निबरर्गी सांप्रदायाचे परम गुरु श्री गुरुदेव रानडे यांचे परम शिष्य होते. त्यांनी दिलेल्या नामस्मरणातून गुरुजी आध्यात्मिक उन्नती साधत होते. आरती व नामस्मरणाशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे.
शेवटच्या श्वासातही रामनाम : शेवटच्या श्वासातही गुरूंनी दिलेले नाम प्रत्यक्ष व्हेंटिलेटरवर असताना सुद्धा गुरुजींच्या मुखातून ऐकू आले, ही गोष्ट लाख मोलाची आहे. त्यांच्या मनात गुरु आणि भगवंतांबद्धल असलेली अपार श्रद्धाच यातून दिसून येते.
आरोग्य संकटांवर मात : एवढे विविध कार्य करीत असतानाही गुरुजींनी आयुष्यात आलेल्या आरोग्याच्या सर्व समस्यांवर मात केली. पक्षाघात, शुगर, करोना या आरोग्य संकटांतूनही सहीसलामत बाहेर पडले, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोविड योद्धाही ठरले.
सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व : गुरुजी वयाच्या 92 वर्षांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करीत राहिले. त्यांचा जीवनप्रवास आपणा सर्वांसाठी एक आदर्श असाच राहिलेला आहे.
अखेरचा श्वास : असे आमचे पिताश्री कै. पद्मराज बापूराव वेळापुरे यांनी ९२ व्या वर्षी शनिवार (दि. १) मार्च २०२५ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना परमशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
