‘सह्याद्रि’तील वेठबिगारी, हुकूमशाही मोडीत काढू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. मनोज घोरपडे; मसूर येथे जाहीर सभा, चेअरमन यांनी मदत करणाऱ्यांच फसवले

कराड/प्रतिनिधी : –

सभासद सह्याद्रिचा मालक आहे, मग तर तुम्ही त्यांचा माफीनामा का घेतला? ऊस दुसरीकडे घातला म्हणून साखर बंद का केली? कामगार संस्थेचा आत्मा आहे, तर त्यांना घरगड्यासारख का वागवता? काही माणसं पोसण्यासाठीच कॉन्टॅक्टरांना कामे देता? कागदपत्र पूर्ण असूनही वारसांच्या नोंदी करत नाही? लागणीचा ऊस 18 महिन्यानंतर का नेता? सहा-सात हजारात कामगारांची पिळवणूक का करता? असे सवाल उपस्थित करत सह्याद्रिच्या सभासदांवर होणारे अन्याय दूर करून कारखान्यातील वेठबिगारी, वतनदारी, हुकूमशाही मोडीत काढून परिवर्तन करणारच, असा ठाम विश्वास आ. मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला.

सभासद मेळावा : मसूर (ता. कराड) येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभासदांचा भव्य मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी कोयना दूध संघाचे माजी चेअरमन वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, जिल्हा नियोजन समितीचे भीमराव पाटील, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने, हिंदकेसरी संतोष वेताळ, कामगार नेते नवनाथ पाटील, शिक्षक नेते अजितदादा साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नियतीनेच उत्तर दिले : प्रोग्रॅमच्या नावाखाली विरोधक असला की, काडी लावूनच ऊस नेता. सत्तेच केंद्रीकरण करून तुम्ही स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आचार, विचार धुळीला मिळवलात. राजकारणात तुम्ही किती खालच्या थराने वागला, त्याचे उत्तर नियतीने उत्तर विधानसभा निवडणुकीत जनतेने दिले असल्याचे आ. घोरपडे यांनी सांगितले.

परिवर्तन घासून नव्हे, ठासून… : तुमच्या मनमानी कारभारामुळे सह्याद्रिचा आलेख खालावला आहे. त्यामुळे सह्याद्रिच्या निवडणुकीत घासून नाहीतर ठासूनच परिवर्तन घडवणार असल्याचा घणाघातही आ. मनोजदादा घोरपडे यांनी केला.

माजी आमदारांनी घराणेशाहीचा कहर केला : सहकार मंत्री असल्याने गत निवडणूक मोठ्या मनाने बिनविरोध केली. नंतरमात्र मनमानी आणि हुकूमशाही कारभार सुरू झाला, असे सांगत आ. घोरपडे म्हणाले, माजी आमदारांनी घराणेशाहीचा कहर करून सह्याद्रिच्या कारखाना, पाणीपुरवठा, शिक्षण व गृहनिर्माण संस्थांमध्ये घरचे चेअरमन कशाला हवेत. वडिलांनंतर सह्याद्रिचा चेअरमन मुलगा झाला, आता त्यांच्या नातवाला चेअरमन करायचे आहे. कामगारांवर वेटबिगारीसारखा अन्याय करता, खाजगी कारखान्यांचा नुसता बाऊ करता. कारखान्यात परिवर्तन झाल्यावर माफीनाम्याचा हिशोब पूर्ण होईल, असे सांगून राजकारणात कामगार कुठेही असला, तरी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.

साथ दिलेल्यांनाच फसवले : ज्यांनी मदत केली, त्या पृथ्वीराजबाबा विलासराव पाटील काकांनाच चेअरमन यांनी फसवले. आम्ही मदत केली म्हणूनच दोनवेळा सह्याद्रि वाचल्याचे वसंतराव जगदाळे यांनी सांगितले.

यात सभासदच होरपळतो : वेळेवर ऊस जात नसल्याने ऊस पेटवून देण्याची वेळ सभासदांवर येते. त्यात सभासदच होरपळतो. आंतरपिके घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे भीमराव पाटील यांनी सांगितले.

मनोगत : संपतराव इंगवले, विनायक भोसले, विजयराव सूर्यवंशी, वसुदेव माने, सचिन शिंदे, उमेश साळुंखे, विश्वास जाधव, अधिक साळुंखे, सुभाषराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमृत जाधव, सुरेश पाटील यांनी आभार मानले.

…यांनी दिला जाहीर पाठिंबा

कामगारांच्या हितासाठी, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबण्यासाठी सह्याद्रिला रामराम केल्याचे कामगार नेते नवनाथ पाटील यांनी सांगितले. तर काम करणारा माणूस आणि खरं बोलणारे नेतृत्व असे म्हणत पै. संतोष वेताळ यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मनोज घोरपडे यांना जाहीर पाठिंबा दिला.  

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!