पृथ्वीराज चव्हाण; शाहू महाराजांनंतर मराठा समाजाला मी आरक्षण दिले
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी सिंचन प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढली होती. ती कोणताही घोटाळा उघड करण्यासाठी नव्हे, तर त्याबाबतची माहिती मागवण्यासाठी काढली. मुळात याप्रकरणी घोटाळा हा शब्द मी कधी उच्चारलाच नाही. परंतु, भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे जाहीरपणे सांगून त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
दीपावलीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कराड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी लोकनेते विलासकाका पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची उपस्थिती होती.
सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली : सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी वरील उद्गार काढले. श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांबाबत झालेल्या आरोपांवरून त्यावेळी मी या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढली होती. त्याची पुढे अँटी करप्शनद्वारे चौकशी झाली. मात्र, त्यानंतर काही घडामोडी करून माझे सरकार पाडण्यात आले. यामुळे सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
शाहू महाराजांनंतर मराठा समाजाला मी आरक्षण दिले : मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? या प्रश्नावर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, मुळात इंग्रजांच्या काळात राजश्री शाहू महाराजांनी सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. यावरून मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगेंची भूमिका स्पष्ट नाही : जरांगे-पाटील यांची निवडणुकीबाबत अध्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. ते मतदारसंघानुसार आपली भूमिका घेणार असल्याचे चर्चा असून अंतिम उमेदवार अर्ज जाहीर झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे एका प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले.
हरियाणा आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी : हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणूक व निकालावर काय परिणाम होईल? या प्रश्नावर ते म्हणाले, मुळात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुकांची तुलना होऊ शकत नाही. त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर हरियाणाच्या निवडणुकीच्या तसेच निकालाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी व्यक्त नमूद केले.
जनता निर्णायक भूमिका घेईल : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा दारू पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही येथील जनता निर्णायक भूमिका घेईल, असा आशावादही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.