कराड/प्रतिनिधी : –
भाजपने जिझिया करासारखे अन्यायकारक कर लादून सरकार चालवले. सोयाबीन, कापूस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर दिला नाही. त्यामुळे लोकसभेला शेतकऱ्यांनी या सरकारला जागा दाखवली. आता विधानसभेतही हेच होईल. कितीही पैसे वाटा. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
प्रचाराचा शुभारंभ : विंग, ता. कराड येथे महाविकास आघाडीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या अलोट जनसमुदायास संबोधित करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हाध्यक्ष डॉ . सुरेश पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, बंडानाना जगताप, काँग्रेस सेवा दलाचे कराड दक्षिणचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, प्रा. धनाजी काटकर, पै. नाना पाटील, आप्पासाहेब गरुड, भानुदास माळी, शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, नामदेव पाटील, नितीन काशीद, नीलम येडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जगाच्या इतिहासात मोठा घोडेबाजार : केंद्रातील अन्यायकारक मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि महाराष्ट्रात अभद्र युती करून उदयास आलेल्या खोके सरकारच्याही चुकीच्या धोरणांमुळे जनतेनेच महायुतीचा पराभव केला असल्याचे सांगत आ. चव्हाण म्हणाले, या पराभवाने भयभीत झालेल्या लोकांनी सत्ता वाचवण्यासाठी जगाच्या इतिहासात मोठा घोडेबाजार केला. मात्र, आता लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जनताच खोके सरकारला त्यांची जागा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कराड जिल्हा करणार : भ्रष्टाचारी कारभारामुळे महाराष्ट्रात नवीन रोजगार येत नाहीत. मोदी राज्यातील रोजगार गुजरातला पळवले असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्यासाठी आवश्यक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. त्यामुळे पुण्यातील 37 कंपन्याही गुजरातला गेल्या. मात्र, कराड दक्षिण व तालुक्यात विमानतळ, रेल्वे स्टेशन, महामार्ग यासह औद्योगिक उद्योग, व्यवसाय वाढीसाठी भौगोलिक परिस्थितीही अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे कराड हा जिल्हा करून या ठिकाणी आयटी हब, बायोटेक्नॉलॉजी उभा करणार आहे. त्याचबरोबर गावागावात वाचनालय, नाना नानी पार्क उभारणार असून क्रीडा, मीडिया क्षेत्रातही मोठा वाव असून लोकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पुन्हा आशीर्वाद द्या : 1991 मध्ये पहिल्यांदा कराड दक्षिणच्या जनतेने मला आशीर्वाद दिल्याच्या सांगत श्री चव्हाण म्हणाले, 6 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून काम केले. महाराष्ट्राची जबाबदारी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कराड जिल्हा होण्याच्या दृष्टिकोनातून तब्बल 1800 कोटींची विकासकामे केली. आता येथील जनतेने काकांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राला दिलेल्या विचाराची नाळ कायम ठेवावी. याठिकाणी दोन विचारधारेची लढाई आहे. वर्ण व्यवस्थेत गुरफटून लोकांची पिळवणूक करणारी व्यवस्था पुन्हा रोखण्यासाठी पाठबळ द्या. राज्यात सत्तारूढ होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपला वाटा असण्यासाठी येथील जनतेने मला पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काका – बाबा वैचारिक संघर्षात दोन्हीकडील हानी झाली : यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्याचा काकांनी पुरस्कार केला. काकांनी व्यक्तिगत नव्हे, तर वैचारिक संघर्ष केल्याचे सांगत उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, विरोधकांनी सत्तेत जाण्यासाठी काकांचा, संघटनेचा आधार घेतला. मात्र सत्तेत गेल्यावर त्यांच्याशी प्रतारणा केली. काका – बाबा वैचारिक संघर्षात दोन्हीकडील हानी झाली. परंतु, शिवरायांनी परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन लढा देण्याची रणनीती आखली. तेच आपण कराड दक्षिणमध्ये करायचे आहे. बाबांना असलेल्या राजकीय अनुभवातून त्यांनी देश व राज्याच्या हितासाठी केलेली कायदे निर्मिती, राज्यात व कराड दक्षिणमध्ये केलेली विकासकामे कराड दक्षिण व तालुक्याचा कायापालट करण्यासाठी त्यांना बळ देणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजकिय प्रतिष्ठेसाठी धडपड : विरोधक जनतेच्या पैशातून उभारलेल्या संस्थांच्या जीवावर निवडणुका खेळत असल्याचे सांगत अविनाश मोहिते म्हणाले, त्यांच्याकडे पैसा आहे, पण राजकिय प्रतिष्ठेसाठी त्यांची धडपड चालली आहे. या उलट मतदारसंघासह राज्याच्या विकासाचे व्हिजन असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याच्या विजयाची हॅट्रिक करून त्यांना राज्यात पाठवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बळीचे राज्य आणा : दहा वर्षांत शेतीशी निगडित सर्व गोष्टींचे भाव वाढले. तर दुसरीकडे शेतमालाचे भाव कमी झाल्याचे सांगत डॉ. भारत पाटणकर म्हणाले, या परिस्थितीस कारणीभूत राज्यातील अडाणी, अंबानी सारख्या सरकारच्या एजंटांना रोखून या सरकारला घरी घालवले पाहिजे. केंद्रातील, महाराष्ट्रातील सरकार घालवल्याशिवाय बळीचे राज्य येणार नाही.
2029 चे भविष्य घडवूया : विलासकाकांच्या नेतृत्वाखाली अविनाशदादांनी कृष्णा कारखान्यात इतिहास घडवल्याचे सांगत अजितराव पाटील – चिखलीकर म्हणाले, विरोधकांना लोकांनी का पाडले, हे पहा. विलासकाकांनी वाकुर्डे योजना आणली. कृष्णा कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या खिशातील पैशातून या योजनेचे थकीत वीजबिल भरले. त्यांनी पैसे स्वतःच्या खिशातून दिले का? काका, बाबांनी पक्षाशी निष्ठा ठेवली. दुसरीकडे पक्ष बदलणारे नेते आहेत. आता आपल्याला 2029 चे भविष्य घडवायचे आहे, असे सुचक विधान त्यांनी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याकडे पाहून केले.
प्रचार सभेस अलोट गर्दी : या प्रचार सभेस कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या अलोट उपस्थिती होती.