उदयनराजे भोसले; अतुल भोसले यांनी साधेपणाने दाखल केला उमेदवारी अर्ज
कराड/प्रतिनिधी : –
कोणतेही पद नसताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनताच लोकशाहीतील खरे राजे आहेत. त्यामुळे जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. लोकसभेला मला कराड दक्षिणमधून अतुलबाबांनी निर्णय मताधिक्य दिले. आता मी त्यांच्यासोबत उभा आहे. खरंतर, त्यांचा प्रचार करण्याची गरजच नाही. त्यांचे कामच सर्व काही बोलते, असे सांगून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
डॉ. अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल :
भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले व कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. 24 रोजी वारकरी, माजी सैनिक, शेतकरी आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, आप्पा माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अडीच वर्षांत 745 कोटींचा निधी :
गेल्या पाच वर्षांत महायुती सरकारकडे आपण मागितलेल्या विकासकामांसाठी आतापर्यंत एकूण 745 कोटी 27 लाख रुपयांचा भरघोस निधी दिला असल्याचे संगत डॉ. अतुल भोसले म्हणाले, त्यातील बहुतांश कमी आज पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. कराडमधील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटींच्या निधीची तरतूद आहे. परंतु, विरोधकांनी केवळ दहा लाखांची तरतूद असल्याचे जाहीर व्यासपीठावर सांगितले. स्वतःला मोठा नेता समजणाऱ्यांनी शासन निर्णय न पाहता असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावत आतापर्यंत माहिती सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणा व व निधीच्या तरतुदीबाबत सर्वांसमोर पुराव्यांनिशी आकडेवारी सांगितली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्याचा समाचारही त्यांनी यावेळी घेतला.
भाजपमध्ये एकमत : कराड दक्षिणमधील भाजपमध्ये एकमत आहे. उमेदवार म्हणून माझा चेहरा असला, तरी प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता या निवडणुकीस उभा आहे, अशी सर्वांची धारणा आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, नव्हते आणि राहणार नाहीत, असा असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हायरल मेसेज वाचल्यावर धक्का बसला : डॉ. अतुल भोसले यांनी विक्रम पावसकर यांचा विधान परिषदेचा पत्ता कट केला. असे सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. यावर बोलताना विक्रम पावसकर म्हणाले, भाजपमध्ये आमदारकीबाबत अशी चर्चा कधीही होत नाही. ज्याचे काम आहे, त्याच्या कामाची दखल घेऊन प्रत्यक्ष त्याच व्यक्तीशी चर्चा केली जाते. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडलेला नाही. सोशल मीडियावरील मेसेज वाचून मलाही धक्का बसला. परंतु, डॉ. अतुल भोसले हे विधानसभेत जाणार असून तेच माझ्यासाठी शब्द टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
व्हिजन : – डॉ. अतुल भोसले.
-
कराडच्या एमआयडीसीची सुधारणा करणे.
-
एमआयडीसी प्रशस्त रस्ते, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, नवीन उद्योग व गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करणे.
-
यशवंतराव चव्हाण कराड ची ओळख – त्यांच्या आदर्शनुसार विकासनिधी आणण्यावर प्रयत्न.
-
कराड दक्षिणचा कायपालट करणार.
-
कराडला रिंग रोड करण्याचा प्रयत्न.
-
नॅशनल हायवेपासून खोडशी ते कराड असा नवीन पुल उभारण्याचा अजेंडा.
-
कृषीवर आधारित उद्योगधंदे निर्माण करणे.
-
कृष्णा कारखान्यामार्फत इंडियन ऑईलच्या माध्यमातून बायो सीएनजी प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करणे.
-
ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे.
-
अध्यात्मिक पर्यटन करण्यावर भर.
आरक्षणाच्या प्रश्नाचे भांडवल करायचे का?
माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना खा. भोसले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा व त्यांच्या राजकीय भूमिकेचा निवडणूकवर तितकाचा परिणाम होणार नाही. मुळात आरक्षणाचा प्रश्न हा जाती-पातीचा, मराठा समाजाचा नाही. परंतु, आरक्षणाच्या प्रश्नाचे भांडवल करायचे का? हे त्यांनी ठरवावे. शिवरायांनी सर्वधर्म समभावाची भूमिका मांडली. जाती-पातीत भेदभाव करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदयनराजे भोसले : –
-
काँग्रेसने सत्ताकाळात लाडकी बहीण योजना का राबवली नाही?
-
एखादा प्रोजेक्ट लांबणीवर पडल्याचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले गेले. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांना दोषी मानता येणार नाही.
-
राष्ट्रवादीने सत्ताकाळात प्रकल्प रखडवले, नवीन योजना आणल्या नाहीत, विकास खोळंबला. त्यामुळेच आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.
-
निवडणुकीच्या तोंडावर फुटाफुटीचे प्रकार घडत आहेत. परंतु, लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. अशांना खरंतर नोबेल पारितोषिक द्यायला हवे.
-
इकडे तिकडे उड्या मारणाऱ्यांना गनिमी काव्याने व्यवस्थित करू.
-
रामराजे फक्त फलटण पुरते मर्यादित.