कोळेत विविध रस्ते व पाणंद रस्त्यांचे उद्घाटन आणि भूमिपूजन; ग्रामीण विकासाला केंद्रबिंदू मानून भोसले कुटुंबाचे काम – आनंदराव पाटील
कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण विकासाला केंद्रबिंदू मानून भोसले कुटुंबाने नेहमीच काम केले आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी आमदार नसतानाही कोट्यवधींचा विकासनिधी आणला. तर आमदार झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जनतेने डॉ. अतुल भोसलेंना पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी आ. आनंदराव पाटील यांनी केले.
विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कोळे येथे मंजूर झालेल्या विविध रस्ते व पाणंद रस्त्यांचे उद्घाटन व भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, अजय पावसकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी : विविध योजनांच्या माध्यमातून आलेल्या निधीबाबत बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून आणि केंद्र व राज्यातील भाजपा-महायुती सरकारच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पेयजल योजनांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय रस्ते विकास, ग्रामीण विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे.
‘कृष्णा’मुळे अनेक कुटुंबांना रोजगार : आज कृष्णा समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे सांगत डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत.
दसपट निधी आणण्याचे कर्तृत्व : डॉ. अतुल भोसले यांनी आतापर्यंत आणलेल्या कोट्यावधींच्या निधीबाबत बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आमदार असताना कुणीही निधी आणेल, पण आमदार नसताना दसपट निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुल भोसले यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व निवडण्याची गरज आहे.
विकासाला गती देण्यासाठी संधी द्या : डॉ. अतुल भोसले यांनी आत्तापर्यंत जवळपास 700 कोटींपेक्षा जास्त निधी आणला. हा आकडा लिहायचे म्हटले, तरी अनेकांना लिहिता येणार नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांनी आतापर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणलेल्या कोट्यावधींच्या निधीमुळे एकही गाव विकासापासून वंचित राहिलेले नाही. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणचा चौफेर विकास झाला असून, या विकासाला गती देण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना येत्या निवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी.
तळगाळापर्यंत योजना पोहचविण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी आलेल्या विकासनिधीचा आढावा घेऊन, समाजातील तळगाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती : यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, विंगचे उपसरपंच सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत, राहुल चव्हाण, साहेबराव देसाई, अस्लम देसाई, महेश पाटील, अहमद देसाई, अतुल घोणे, श्रीरंग कुंभार, निसार मुजावर, अशोक शिनगारे, निवास मोरे, तेजस पाटील, विनायक कुंभार, राहुल कुंभार, प्रसाद लटके, महेश लाटे, चेतन पवार, मनोज कुंभार, राम जाधव आदींसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
या कार्यक्रमात कोळे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कराळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, राजेश देसाई, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील, सोसायटीचे संचालक संतोष दादासो पाटील, गोसावी समाजाचे अध्यक्ष बाबुराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी डॉ. अतुल भोसले यांच्या गतिमान कार्याला पाठिंबा देत, भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.