पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; 150 शाळांना कॉम्पुटरसह शैक्षणिक साहित्याचे वाटप
कराड/प्रतिनिधी : –
सध्याच्या सरकारचं शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. पवित्र पोर्टलबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. जुन्या पेन्शन योजनेबाबत अनेक मुद्दे असून शिक्षकांच्या सर्व प्रश्नांकडे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करते आहे. परंतु, काँग्रेस शासित राज्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसह पवित्र पोर्टलबाबत (Pavitra portal) ठामपणे आमचे सरकार योग्य निर्णय घेईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (Mla Prithviraj Chauhan) यांनी व्यक्त केला.
शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे सातारा जिल्ह्यातील 300 शाळांना, तसेच कराड तालुक्यातील 150 शाळांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, संगणक आणि शैक्षणिक साहित्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, आर. वाय. जाधव, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, शारीरिक शिक्षक संघटना उपाध्यक्ष महेंद्र भोसले, मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार यांच्यासह 750 हून अधिक शाळांचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
संगणक साक्षरता गरजेची : यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आ. जयंत असगावकर सरांनी आपला आमदारकीचा फंड फक्त शैक्षणिक साहित्य देण्यासाठीच वापरला. संगणक साक्षरता अंत्यत गरजेची आहे. AI तंत्रज्ञानामुळे अनेक रोजगार नष्ट होतील. शिक्षण क्षेत्रावर गदा येईल. संगणक क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल होणार आहेत. संगणक क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे.
सध्या भारतात एकही काँम्पुटर चीफ तयार करणारी कंपनी नाही. एआय तंत्रज्ञानात आपण मागे पडून चालणार नाही. असे सांगत आ. चव्हाण म्हणाले, तंत्रज्ञानातील बदलाच्या आव्हानला सामोरे जावेच लागेल. संगणक साक्षरतेचे फायदे आणि आव्हान आपण बघितले पाहिजे. दरडोई उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य आज 11 व़्या स्थानावर घसरले आहे. राजकारणामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दहा वर्ष उशिर झाला.
फक्त एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल :मी शिक्षक आमदार असल्याने रस्त्यासाठी किंवा गटारांसाठी एक रुपया निधी मी दिला नाही. मात्र, सर्व फंड शाळा साहित्य देण्यासाठी वापरला असल्याचे सांगत आ. जयंत आसगावकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या काळात शैक्षणिक दर्जा कसा वाढवावा. अनेक योजना राबवता आल्या. फक्त एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल अशा पद्धतीने मी काम करत आलो आहे. शिक्षकांनी मला भेटण्यापेक्षा मला फोनवरून काम सांगावे ते करण्यासाठी मी तत्पर असेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले.
बाबांनी शाळांना कम्प्युटर लॅब दिल्या
कराड दक्षिण मतदार संघातील तब्बल 70 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, संगणक यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील अनेक शाळांना कम्प्युटर लॅब देण्यात आल्याचे यावेळी आवर्जून शिक्षकांनी सांगण्यात आले.