३०० वर्षांची परंपरा; कृष्णा घाट समितीच्या विविध उपक्रमांना प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
कराडचा दीपोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी सायंकाळी कृष्णा घाट परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव कृष्णा घाट समितीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
देवांच्या विजयाचे प्रतीक : दीपावलीनंतर येणारा हा विशेष सण देव-दानव संग्रामातील देवांच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. त्रिपुरारी राक्षसाचा वध झाल्यानंतर देवांनी केलेल्या उत्सवापासूनच देवदीपावली साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. त्या स्मरणार्थ देशभरात, तसेच कराडमध्ये प्रत्येक वर्षी हजारो दिवे लावून देवदीपावली साजरी केली जाते.

कृष्णा घाट, मंदिर, नक्षत्र उद्यान तेजोमय : याप्रसंगी कृष्णा घाट समितीचे अध्यक्ष बळवंत नारायण बुधकर, उपाध्यक्ष विठ्ठलअण्णा शिखरे, सदस्य अमित बुधकर, सदानंद गरुड, विश्वनाथ (काका) जोशी आणि कार्यकर्त्यांनी घाट परिसरात दिव्यांची सजावट केली होती. या प्रकाशाने संपूर्ण कृष्णा घाट, मंदिर परिसर आणि नक्षत्र उद्यान तेजोमय झाले होते. यावेळी करण्यात आलेल्या आकर्षक आतिषबाजीने उत्सवाला अधिक रंगत आणली.
वर्षभरात धार्मिक व सामाजिक उपक्रम : समितीच्या वतीने वर्षभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात कृष्णामाई मंदिर सुशोभीकरण, घाट परिसर स्वच्छता मोहीम, विविध भक्तिगीतांचे कार्यक्रम आदींचा समावेश आहे. तसेच समितीमार्फत विकसित केलेल्या नक्षत्र उद्यानाला भाविकांसह नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो.
दीपदान : बुधवारी देवदीपावलीत अनेक महिला भाविकांनी कृष्णा काठावर तिळाच्या तेलाचे दिवे प्रज्वलित करून दीपदान केले. संध्याकाळभर परिसरात दीपप्रकाश आणि भक्तिभावाचे वातावरण पसरले होते.
कृष्णामाईची विशेष पूजा
कृष्णामाई मंदिरात नवरात्रोत्सव, यात्रा कालावधी आणि विशेष सण समारंभ निमित्त देवीची वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते. बुधवारी सायंकाळी देवदीपावली निमित्ताने देवीची विशेष पूजा बांधण्यात आली होती. महिला भाविकांनीही घाट परिसरात दीप प्रज्वलन करून कृष्णामाईचे भक्तीभावात दर्शन घेतले.











