भागवत एकादशी निमित्त श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट, कराडचा उपक्रम
कराड/प्रतिनिधी : –
श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट, गुरुवारपेठ भाजीमंडई, कराड यांच्या संकल्पनेतून कार्तिक भागवत एकादशीच्या औचित्याने रविवार, दि. २ नोव्हेंबर गोरक्षण संस्थेच्या परिसरात संपुर्ण गीता पठण आणि विष्णू सहस्रनाम पठणाचा भक्तिमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
अडीच तास अखंड गीता पठण : दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेची पूजा करून झाली. सुमारे अडीच तास अखंड गीता पठणामुळे संपूर्ण गोशाळा परिसर भक्तीभाव आणि सकारात्मक ऊर्जेने भारला होता. गोमातेच्या सान्निध्यात गीता पठणाचा हा दुग्धशर्करायोग अनुभव भागवत एकादशीच्या शुभ मुहूर्तावर साध्य झाला.
उद्देश : या कार्यक्रमाचा उद्देश गोरक्षण कार्यात अधिकाधिक जनसहभाग वाढवणे, गोमातेबद्दल समाजात जागृती निर्माण करणे आणि गोसंवर्धनाच्या महत्त्वाबाबत धार्मिक, तसेच अध्यात्मिक भान दृढ करणे हा होता. महिलांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्याची माहिती : याप्रसंगी श्री गोरक्षण संस्था ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल अनंत पावसकर यांनी गोशाळेची सद्यस्थिती व कार्याची माहिती दिली. सौ. विशाखा कित्तुर यांनी प्रास्ताविक केले, तर विश्वस्त सौ. ज्योती दिपक दंडवते यांनी आभार मानले.
वाचकांचा सत्कार : यावेळी गीता तोंडपाठ करणाऱ्या पाच गीता वाचकांचा सत्कार करण्यात आला.
विशेष सहकार्य व योगदान : कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त अनिल कडणे, महेश हरीभाऊ कुष्टे, श्रीधर घळसासी, श्रीधर बळकुंदीकर आणि श्रीमती गीता सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सौ. वीणा घळसासी आणि सौ. स्मितांजली जोगळेकर यांचेही योगदान उल्लेखनीय राहिले.