प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराडनगरीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याचा उपक्रम ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ सातत्याने राबवत आहे. प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार हा समाजातील प्रत्येकासाठी ऊर्जा देणारा आणि प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे यांनी काढले.

पुरस्कार वितरण सोहळा : कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात यंदाच्या राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : व्यासपीठावर महंत आहिल्यागिरीजी महाराज, प्रा.डॉ. विनोद बाबर, गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, टीव्ही 9 मराठीच्या वृत्तनिवेदिका सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, ॲड. धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

‘महाराष्ट्रातील माणिकमोती’ पुस्तकाचे प्रकाशन : कार्यक्रमात ‘महाराष्ट्रातील माणिकमोती’ या डॉ. संदीप डाकवे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन व स्व. राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाचे बोधचिन्हाचे लोकार्पणही करण्यात आले. या बोधचिन्हाची रचना सुप्रसिद्ध कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे.

उद्योजक समाजाला दिशा : निलेश खरे म्हणाले, संदीप डाकवे हे उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या कलेवरील प्रेमामुळे मी या कार्यक्रमाला आलो आहे. उद्योजक समाजाला दिशा देतात आणि घडवतात, त्यांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान आहे.

प्रेरक भाषण : प्रा. विनोद बाबर यांच्या प्रेरक भाषणाने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर गायक विजय सरतापे यांनी सादर केलेल्या “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” या गीताने कार्यक्रमाला रंगत आणली. स्पंदन ट्रस्टचे संस्थापक डॉ. संदीप डाकवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यंदाच्या स्पंदन जीवनगौरव पुरस्काराची रोख रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेत ट्रस्टने आपली संवेदनशीलता दाखवली.

पुरस्कार व सन्मान : कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड प्रदान करण्यात आले. तसेच स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी, निबंध स्पर्धा यातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. सीए परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल अधिक डाकवे यांना विशेष मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इ. १० वीमध्ये प्रथम आलेल्या वैष्णवी पाटीलला स्व. राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक रोख रक्कम, सन्मानपत्र आणि ‘तात्या’ पुस्तक देण्यात आले.

परिश्रम : कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप डाकवे, सूत्रसंचालन सौ. अंजली गोडसे, चंद्रकांत चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कथ्थक नृत्यांगना माधुरी करपे हिच्या गणेशवंदनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, समाधान पाटील, जालिंदर येळवे, गुलाब जाधव, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे आदींनी परिश्रम घेतले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!