जखिणवाडीचे माजी सरपंच पांडुरंग पाटील यांचे निधन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

जखिणवाडी (ता. कराड) गावचे माजी सरपंच, रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गणपती पाटील उर्फ पी. जी. पाटील, (आण्णा) यांचे मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

प्रभावी नेते : पी. जी. पाटील (आण्णा) हे सत्तरच्या दशकामधील कराड तालुक्यातील प्रभावी सहकार नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने जखिणवाडीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मोलाचा वाटा : पांडुरंग (आण्णा) पाटील हे माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रामविकास, शिक्षण व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. गावात अनेक विकासकामे, रस्ते, पाण्याच्या योजना, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

उल्लेखनीय काम : श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांची धडपड होती. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले.

समाजभिमुख नेता गमावला : आण्णा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात कार्यतत्परता, साधेपणा आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची वृत्ती होती. त्यांच्या निधनाने जखिणवाडी गावाने एक खरा समाजभिमुख नेता गमावला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

रक्षाविसर्जन : त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी जखिणवाडी येथे होणार आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!