कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे.
पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास : कराड दक्षिण मतदारसंघात अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली पर्यटनस्थळे आहेत. तसेच अनेक देवस्थाने, मठ, मंदिरे आणि सांस्कृतिक परंपरा आहेत. या ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास करण्यासाठी कराड दक्षिणचे आमदार भोसले विशेष प्रयत्नशील आहे. कराड दक्षिणमधील रेठरे बुद्रुक व आटके येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभुराज देसाई यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल घेत राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.












