????श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व भ्रमंतीची पुनरावृत्ती!????

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग नववा : 

आयुष्यातील पहिलीच गड भ्रमंती पुढील सगळ्या आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरली तर होतीच; पण आमच्या जीवनात एक नवी क्रांती घडवून गेली होती. तो दिव्य श्वान नजरेआड झाला होता पण आमच्या हृदयात आजअखेर आपले स्थान त्याने टिकवून ठेवले!

पण पहिल्या भ्रमंतीत भेटलेला तो त्यानंतर तीन वेळा आम्ही वासोट्याची सफर केली तेव्हा मात्र कधीच नजरेस पडला नाही. नेमका कोण असेल तो? कुणी तपस्वी, योगी, सत्पुरुष की कोणी दिव्य देवता?……आमच्या अल्पज्ञ बुद्धीला न उलगडणारे हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. एक मात्र खरे की त्यानंतरच्या अनेक भ्रमंतीत या ना त्या रुपात अगदी आजही आमची पाठराखण करत उभा आहे हे मात्र निश्चित! त्याचा खुलासा उद्याच्या भागात होईल पण तोपर्यंत……

सायकलवरून फिरण्यासाठी जितके आम्ही उत्सुक होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी आता उतावीळ होऊ लागलो होतो.

कराड ते औध (श्रीयमाई दर्शन) हा एक दिवसीय पहिला लांबचा प्रवास (तो १९८७-८८ साली) सायकलवरूनच पूर्णत्वास गेला होता. त्यामध्ये धनंजय हापसे, विजय उंडाळकर, बंडा कुंभार, भास्कर थत्ते, अलंकार जोशी असे सहभागी होतो. मे १९८९ मध्ये संजय वैद्य काका बरोबर मी व विजय पाटील आम्ही चाफळची सायकल सवारी केली होती. कराड ते मुंबई हा सायकल प्रवास सलग दोन वर्षे आम्ही केलाच होता तसाच कराड, वाई, महाबळेश्वर हा प्रवास देखील दोन वेळा यशस्वी झाला होता. कराड ते कोल्हापूर, पन्हाळा, ज्योतिबा तिथून बत्तीस शिराळा व परत कराड असाही सायकल प्रवास आधीच करून झाला होता. अर्थात या प्रत्येक प्रवासात वेगवेगळे सवंगड्यांची साथसोबत लाभली होती.

या सायकल प्रवासात कोण कोण होते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. तर मी व अलंकार जोशी, विजय पाटील, सचिन रेठरेकर, चंदू कुर्लेकर, दिनेश इनामदार, नरेश काळे (बेलापूर) यांचा नामोल्लेख करावा लागेल.

वासोटा किल्ल्याची भ्रमंती झाली आणि आता सायकल प्रवास करणं मागे पडत होते. बामणोली ते कराड हा बसचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरी परतलो होतो. कुणीच काही बोलण्याच्या किंवा सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हते पण ” *कितीही झाकले तरी कधी ना कधी उघडे पडणारच”!* झालेही तसेच कुठून तरी आम्ही कोल्हापूरला न जाता वासोटा किल्ल्यावर गेलो होतो ही बातमी ‘ *लिक* ‘ झाली आणि बघता बघता ‘ *व्हायरल* ‘ झाली. एका पाठोपाठ एक चौकशीचा *ससेमिरा* आमच्या मागे लागला.

आता सगळे गुपित उघड झाले आहे तर किमान सवंगड्याना तरी सांगितले पाहिजे म्हणून आम्ही एकत्र जमलो. जे कोणी बाल सोबती जमले होते त्यांना आम्ही सांगत असलेला वासोट्याचा अनुभव कितपत समजला होता हा भाग गौण होता. पण तो ऐकताना त्यांची झालेली अवाक अवस्था, तोंडाचा वासलेला ‘आ’ आणि वाढीस लागलेली उत्कंठा आम्हाला स्पष्टपणे दिसून येत होती.

*”आम्हालाही वासोट्याला घेऊन चला”* असा जणू बाल हट्ट त्यांनी धरला. आम्हीही *”ठीक आहे जाऊया”* अशा शब्दांत त्यांना होकारार्थी धीर दिला. पण खरंच असे घडणार होते का? की आम्ही फक्त वेळ मारून नेत होतो? जून महिना सुरू झाला आणि सगळे शाळेत गुरफटून गेले. तो विषय थोडा मागे पडला. मधले काही महिने असेच सरत गेले आणि गणेशोत्सव सुरू झाला. मयूर गणेश मंडळाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व मित्रमंडळी एकत्र आली व न कळत मूळ विषयाला पुन्हा तोंड फुटले.

यातून आपली सुटका नाही हे ओळखून आम्ही “दिवाळीत वासोट्याला जाऊ” असे सांगून पुन्हा एकदा वेळ मारून नेली. नवरात्र संपले आणि दिवाळीच्या सुट्टी सुरू झाल्या. पुन्हा आपले पाढे पंचावन्न सुरू झाले. ‘करो या मरो’ अशा अवस्थेत आम्ही सापडलो. पहिला अनुभव गाठीशी होता व पुन्हा एकदा आम्ही वासोटा सर करण्यासाठी सज्ज झालो. फक्त ” *पुढच्याला ठेच मागचा शहाणा”* या म्हणीनुसार आम्ही तयारीला लागलो.

सर्व प्रथम पाठीवर अडकवण्याची सॅक व चांगले बूट ही प्राथमिक गरज होती. पण आर्थिक परिस्थिती विचारात घेता महागड्या वस्तू घेणे कुणालाच परवडणारे नव्हते. मग आम्ही शोधाशोध सुरू केली आणि आम्हाला अगदी हवे तसे ठिकाण सापडले. एसटी स्टँडच्या बाहेर एक खोके वजा दुकान होते व त्या ठिकाणी मिलिट्री सॅक व बूट स्वस्त दरात मिळतात अशी बहुमूल्य माहिती मिळाली. वेळ न दवडता ते दुकान गाठले व ज्यांना ज्या वस्तू घेणे शक्य होते त्यांनी त्या खरेदी केल्या.

पहिल्या वेळी कोण येणार याची चिंता होती तर यावेळी नेमके कुणाला घ्यायचे व कुणाला टाळायचे यावर खलबते सुरू झाली. कारण जो तो आम्ही येणार म्हणून हट्ट धरून बसला होता. पण घरातून परवानगी मिळणार का? या प्रश्नावर *”तुम्ही येऊन सांगा म्हणजे सोडतील”* हे अगदी साच्यातील उत्तर मिळत होते.

बघता बघता दिवस सरत आले. दिवाळी अगदी तोंडावर आली. प्राथमिक तयारी झाली होती आता पुढचे नियोजन सुरू केले होते. म्हणजे यावेळी जाताना पूर्ण तयारीनिशी जायचे असे ठरवले होते. थोडक्यात सांगायचे तर संध्याकाळी भोजन करण्यासाठी लागणारे साहित्य (पातेले, तांदूळ, तेल, बटाटे, कांदे, तिखट, मीठ, मोहरी, जिरे, हळद इ.) शिवाय सकाळचा नाश्ता बनविण्यासाठी पोहे. थोडक्यात म्हणजे यावेळची भ्रमंती अगदी साग्रसंगीत होणार होती.

क्रमशः
समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार, कराड)
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!