ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कौतुक; कामाला तातडीने गती देण्याचे प्रशासनाला आदेश

कराड/प्रतिनिधी : –

ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते.

कामाला गती देण्याचे आदेश : यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

नव्या पिढीला प्रेरणा : गोळेश्वर येथील पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पै. खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा : या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

आंतरराष्ट्रीय स्टँटर्डनुसार निर्मिती : मुंबईत क्रीडामंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आ. डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडामंत्री ना. भरणे यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटस्‌ यांनी या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला असून, बैठकीत सिनीअर आर्किटेक्ट अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय स्टँटर्ड लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे पारकर यांनी सांगितले.

तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही : दरम्यान, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी. तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

उपस्थिती : याप्रसंगी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप उपस्थित होत्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!