प्रहार जनशक्ती पक्षाची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
कराड/प्रतिनिधी : –
येथील स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला मागील अनेक वर्षांपासून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा व वाढीव बेड मिळावे, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गोरगरीब रुग्णांवर खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
निवेदन : या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना एक सविस्तर निवेदन सादर करून, कराड उपजिल्हा रुग्णालयातील असलेल्या तातडीच्या गरजांकडे लक्ष वेधले आहे.
या आहेत मागण्या : यामध्ये २०० खाटांचे वाढीव बेड, ट्रॉमा केअर युनिट, एम.आर.आय. सुविधा, मंजूर असूनही स्थलांतरित करण्यात आलेली कॅथलॅब पुन्हा कराडला कार्यान्वित करणे, तसेच रिक्त तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरी व्यवस्था : कराड, पाटण, खटाव, कडेगाव, शिराळा यांसारख्या तालुक्यांतील नागरिक कराडच्या उपजिल्हा रुग्णालयावर उपचारांसाठी अवलंबून आहेत. मात्र, सद्यस्थितीत येथे केवळ १०० खाटांचीच व्यवस्था असून, रुग्णसंख्येच्या तुलनेत ही व्यवस्था पुरेशी नाही. याशिवाय, अपघातग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले ट्रॉमा केअर युनिट आणि एम.आर.आय. सुविधा येथे उपलब्ध नाही. परिणामी गंभीर रुग्णांना वेळ वाया घालवून खासगी रुग्णालयात हलवावे लागते.
सर्व नियम धाब्यावर बसवले : सन २०२२ मध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाने कॅथलॅब मंजूर केली होती. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून ती सुविधा सातारला स्थलांतरित करण्यात आली, हे अतिशय अन्यायकारक असून यामागील कारणे अस्पष्ट असल्याची टीका या निवेदनात करण्यात आली आहे. कराडसाठी मंजूर झालेली ही सुविधा कराडलाच परत कार्यान्वित करावी, अशी ठाम मागणी माळी यांनी केली आहे.
अन्यथा आंदोलन तीव्र करणार : या निवेदनाची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रुग्णालय दत्तक घेऊन स्मार्ट रुग्णालय म्हणून विकसित करा
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने उभारले जावे आणि महाराष्ट्रासाठी एक “स्मार्ट रुग्णालय” म्हणून आदर्श ठरावे, यासाठी आरोग्यमंत्र्यांनी स्वतः हे रुग्णालय दत्तक घ्यावे, अशी भावनिक आणि ठाम मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दीर्घकाळपासून संघर्ष
सदर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष २०१५ पासून आंदोलने, निवेदने व आमरण उपोषण करत असून, अद्यापही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता या विषयावर निर्णायक पावले उचलण्याची गरज आहे, असे मत मनोज माळी यांनी व्यक्त केले आहे.
