रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते शिल्पकारांना पाच लाखांचा धनादेश सुपूर्द
कराड/प्रतिनिधी : –
उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, हे कार्य संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून भविष्यातील प्रत्येक पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा मिळणार असल्याचे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.
शिवयोद्धा प्रतिष्ठानकडून उभारणी : उंब्रज (ता. कराड) येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे.
हिंदू कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा : या पवित्र कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत मदतीचा हात द्यावा, तसेच हिंदू धर्मासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी केले.
सव्वादोन लाखांची मदत : या पुतळा उभारणीसाठी रामकृष्ण वेताळ यांनी २ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून, शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांना ५ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
शिल्पकाराकडे धनादेश सुपूर्द : बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून किल्ले रायगड राजसदरवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीतील प्रसिद्ध मूर्ती साकारणारे शिल्पकार सतिश घार्गे यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला.