राजकारणातील दृष्टे नेतृत्व : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आज १७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रतिनिधी आणि कराडकरांच्या हृदयात ‘बाबा’ म्हणून विराजमान असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा आदरपूर्वक आढावा घेताना ऊर भरून येतो.

प्रामाणिक तंत्रज्ञ, दूरदर्शी नेते : पृथ्वीराज बाबा हे केवळ एक राजकारणी नाहीत; ते एक प्रामाणिक तंत्रज्ञ, दूरदर्शी नेते आणि चव्हाण कुटुंबाच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहेत. मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कराडला झुकते माप दिले, पण त्याच वेळी राज्यातील इतर जिल्हे वा तालुक्यांवर अन्याय होऊ नये याचीही काळजी घेतली. हा संतुलित दृष्टिकोन हाच त्यांच्या नेतृत्वाचा गाभा आहे.

शिक्षण आणि तांत्रिक प्रावीण्य : कराड नगरपालिकेच्या मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतातील प्रतिष्ठित बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना जर्मनीतून युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे गेले आणि तेथून मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केली.

देशासाठी योगदान देण्याची जिद्द : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरीत रमण्याची इच्छा नव्हती. तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग-व्यवसाय सुरू करून देशासाठी योगदान द्यावे, अशी त्यांची जिद्द होती. आई-वडिलांनी राजकारणातील काटेरी खुर्चीचा अनुभव घेतल्यामुळे राजकारणापासून दूर राहण्याची त्यांची इच्छा होती.

राजीव गांधींसोबतचे स्नेहसंबंध : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे बाबांचे लहानपणापासूनचे सवंगडी होते. बाबांच्या आई आणि इंदिरा गांधी यांचे सख्य सर्वश्रुत आहे. शालेय सुट्टीच्या काळात दिल्लीत दोघांची ओळख झाली. दोघांचीही दिशा स्पष्ट होती, राजकारणात जायचे नाही. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. राजीव गांधी अपघाताने राजकारणात आले आणि त्यानंतर बाबांच्या आयुष्यालाही वेगळी दिशा मिळाली.

अमेरिकेतील तांत्रिक कारकीर्द : राजकारणात येण्यापूर्वी पृथ्वीराज बाबांनी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली परिसरात काम केले. Palo Alto येथे त्यांनी एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये काम करताना पाणबुडी-विरोधी युद्धप्रणालीसाठी व्हिडिओ रेकॉर्डर विकसित केला. अमेरिकेत भरपूर संधी असतानाही आपल्या ज्ञानाचा फायदा मायदेशाला व्हावा म्हणून ते भारतात परतले.

संगणक क्षेत्रातील योगदान : भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी ‘अप्लाईड इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स’ ही कंपनी स्थापन केली. याच काळात राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवली. संगणकात प्रादेशिक भाषा वापरता याव्यात या दृष्टीकोनातून पृथ्वीराज बाबांच्या टीमने एक सर्किट विकसित केले. आज भारतात संगणकावर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगूसह सर्व प्रादेशिक भाषा वापरल्या जातात; त्याचे जनकांपैकी एक पृथ्वीराज चव्हाण मानले जातात. ही उपलब्धी केवळ तंत्रज्ञानाची नाही, तर भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची आहे.

जाहिरात

राजकारणातील प्रवेश आणि जबाबदाऱ्या : सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर बाबांची राजकीय घोडदौड सुरू झाली. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस झाले. जम्मू-काश्मीर, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विश्वासू निकटवर्तीयांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी राहिले.

पंतप्रधान कार्यालयातील भूमिका : पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री म्हणून काम केले. संसदीय कामकाज, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांचे कामकाज अत्यंत संयमी, अभ्यासपूर्ण आणि समन्वय साधणारे होते.

भारत-अमेरिका अणुकरारातील भूमिका : भारत-अमेरिका अणुकरार मंजूर करणे, हे त्या काळातील सर्वात मोठे राजकीय आव्हान होते. त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश होते. डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले. या कठीण परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करून राजकीय संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्था आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) आणि आण्विक पुरवठादार गट (NSG) यांनी भारताला नागरी अणुऊर्जा व्यापारासाठी परवानगी दिली. अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न करता ही अनुमती मिळवणारा भारत जगातील पहिला देश ठरला.

कोरोना काळातील संवेदनशीलता : कोरोना महामारीच्या काळातही बाबांची लोकसेवा दिसून आली. वुहान येथे अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला भारतात परत आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून भारतीय वायुसेनेच्या विमानाची व्यवस्था करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

आजही तितक्याच जोमाने कार्यरत : आजही बाबा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नसताना देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशा कार्यक्षमतेने कार्यरत आहेत. कराडच्या विकासासाठी त्यांचे योगदान सुरूच आहे.

प्रेरणादायी वारसा : बाबांच्या जीवनातून प्रेरणा घेणारे कराडकर, महाराष्ट्रवासी आणि देशभरातील लाखो अनुयायी त्यांच्या कार्याचा आदर करतात. त्यांचे राजकीय व सामाजिक जीवन हे प्रामाणिकता, तंत्रज्ञान, राजकीय कुशाग्रता आणि लोकसेवेचे अद्वितीय मिश्रण आहे. दिवंगत आनंदराव चव्हाण उर्फ दाजीकाका व मातोश्री प्रेमलाताई चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकीय वारशाला बाबांनी न्याय दिला आहे. आज महाराष्ट्र आणि देशासमोर अनेक आव्हाने उभी असताना बाबांसारख्या अभ्यासू व दूरदर्शी नेत्याची गरज प्रकर्षाने जाणवते.

आदरणीय बाबा, आपणांस दीर्घायुष्य, निरोगी आरोग्य आणि अखंड यश लाभो. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 

– तुषार गायकवाड. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!