विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कराड/प्रतिनिधी : –
येथील नगरपालिका व एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबच्या माध्यमातून पर्यावरण दिनानिमित्त गुरूवारी कराड शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश देण्यात आला.
डॉ. सुरेशबाबांनी दाखवला हिरवा झेंडा : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शिवतीर्थ दत्त चौकातून या सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सहभाग : या रॅलीत कराड नगरपालिका, एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लब, कराड अर्बन बँक, कराड हॉस्पिटल असोसिएशन, कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री साखर कारखाना, संगम हेल्थ क्लब, प्रीतिसंगम सायकल ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ग्रुप व पर्यावरण प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. रॅलीच्या शुभारंभापुर्वी सर्वांना प्लास्टिक वापराविरोधात शपथ देण्यात आली.
रॅलीचा मार्ग : शिवतीर्थ दत्त चौकातून रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून चावडी चौक, कन्याशाळा, नगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उपजिल्हा रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत रॅली काढून उद्यानात रॅलीचा समारोप करण्यात आला.
उपस्थिती : यावेळी चंद्रकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल, डॉ. राहुल फासे, अॅड. संभाजी मोहिते, रमेश पवार, ए. आर. पवार, राहुल खराडे व पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
प्लास्टिक कॅरीबॅग मुक्त शहर करणार
‘प्लास्टिकचे प्रदूषण थांबवा’ ही यावर्षीच्या जागतीक पर्यावरण दिनाची थीम आहे. त्यादृष्टीने सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जगजागृती व प्रबोधन करण्यात आले. तसेच कराड शहरात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अधिक उपक्रम राबवण्यात यावेत, याबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संस्था आणि नगरपालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. यापुढे शंभर टक्के प्लास्टिक कॅरीबॅगमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद यावेळी बोलताना सांगितले.
प्लास्टिक विघटनावर कृष्णाचे संशोधन सुरू
प्लास्टिक वापराविरोधात शपथ घेण्यात आली आहे. खरोखरच सर्वांनी या प्रतिज्ञेचे काटेकोर पालन करावे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ‘कृष्णा’च्या माध्यमातून प्लास्टिक विघटनावर संशोधन सूरू असल्याचे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
