मला किंगमेकर व्हायची हौस नाही 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार अतुलबाबा भोसले; ‘सह्याद्रि’बाबत घेतला सावध पवित्रा 

कराड/प्रतिनिधी : – 

‘सह्याद्रि’चा सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद नाही. परंतु, सहकारामध्ये मदतीचे राजकारण करायची संस्कृती असून त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही, ही आमची भूमिका आहे. असे सांगत मला किंगमेकर व्हायची हौस नाही, असा टोला आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे नाव न घेता लगावला.

पत्रकार परिषद : येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

हस्तक्षेप नाही : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत तुमची भूमिका काय? या प्रश्नावर बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा म्हणाले, स्वर्गीय जयवंतराव अप्पा, डॉ. सुरेशबाबा आणि मीही सहकारात काम करताना इतर कोणत्याही सहकारी संस्थांना मदतीचे राजकारण करायचे, त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही, हे आतापर्यंतची आमची भूमिका राहिली असून आमची हीच भूमिका कायम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे संस्कृतीला अनुसरून नाही : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याला ऊस घालतात, त्या सभासदांनी योग्य ते निर्णय घ्यावा. असे सांगत आपली भूमिका स्पष्ट करताना आ. डॉ. भोसले म्हणाले, किंगमेकर म्हणून स्वतःचे पोस्टर इकडे-तिकडे लावून घेण्याची मला हौस नाही, असा टोला त्यांनी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे नाव न घेता लगावला. त्याचबरोबर आपण आपल्या कार्यक्षेत्रात आपापली भूमिका मांडत असतो. इतरांचा संस्थांमध्ये ढवळाढवळ करणे, हे सहकाराच्या संस्कृतीला अनुसरून नाही. त्यामुळे आपण सह्याद्रि’च्या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

हा संशोधनाचा भाग 

सह्याद्रि’च्या निवडणुकीत आमदार आणि जिल्हाध्यक्षांची भूमिका  वेगवेगळी दिसत असून दोन्ही बाजूला तुमची छबी दिसत आहे? या प्रश्नावर बोलताना आ. अतुलबाबा म्हणाले, हा खरं तर संशोधनाचा भाग आहे, असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच या प्रश्नाला बगल देत ते म्हणाले, आमच्या पक्षात मोठी इन्कमिंग सुरू आहे. लवकरच याबाबत मोठा धमाका होईल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!