जनकल्याण पतसंस्थेचा ९६० कोटींचा व्यवसाय, ७ कोटींहून अधिक नफा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ठेवी ५९५ कोटींच्या पुढे, कर्जवाटप ३६४ कोटी, नव्या शाखांसह डिजिटल सेवांवर भर 

कराड/प्रतिनिधी : – 

स्थानिक सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या जनकल्याण पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगतीचा आलेख अधिक उंचावला आहे. काटेकोर नियोजन, प्रभावी कर्जवसुली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे संस्थेचा एकूण व्यवसाय तब्बल ९६० कोटी रुपयांहून अधिक झाला असून, ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त नक्त नफा मिळवण्यात संस्थेला यश आले आहे.

नक्त एनपीएचे १.८५ टक्क्यांवर : संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षाअखेरीस संस्थेकडे ५९५ कोटी रुपयांहून अधिक ठेवी जमा झाल्या आहेत, तर ३६४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. तसेच विविध बँकांमध्ये ३१७ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली असून, स्पर्धात्मक वातावरणातही संस्थेने नक्त एनपीएचे प्रमाण १.८५ टक्क्यांवर नियंत्रित ठेवले आहे.

अत्याधुनिक सेवा-सुविधा : संस्थेने ग्राहकाभिमुख धोरण स्वीकारत डिजिटल सेवांवर विशेष भर दिला आहे. यामध्ये युटिलिटी पेमेंट्स, फास्टॅग, क्यूआर कोड, टॅक्स कलेक्शन, आरटीजीएस, एनईएफटी आणि प्रीपेड डेबिट कार्डसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच मोबाईल बँकिंग सेवा सुरू असून, आगामी एक-दोन महिन्यांत UPI पेमेंट सुविधा सुरू करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.

सभासदांचा प्रतिसाद : विमा क्षेत्रातही संस्थेने पाऊल टाकत जनरल व लाईफ इन्शुरन्सच्या विविध योजना सभासदांसाठी उपलब्ध केल्या आहेत. वाहन, फायर, मरीन, इंडस्ट्रियल व हेल्थ इन्शुरन्ससह टर्म इन्शुरन्स योजनांना सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रिबेटची रक्कम खात्यांमध्ये जमा : नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने सलग १५ वर्षे व्याजदरात सवलत देत आतापर्यंत ८.३२ कोटी रुपयांचा रिबेट वितरित केला असल्याचे सांगत उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर म्हणाले, चालू वर्षातील रिबेटची रक्कमही लवकरच संबंधित खात्यांमध्ये जमा करण्यात येणार असून, ही योजना पुढेही कायम ठेवली जाणार आहे.

नव्या शाखा सुरू : आगामी आर्थिक वर्ष आव्हानात्मक असले तरी त्याचा समर्थपणे सामना करण्याची तयारी संस्थेने केली आहे. विस्ताराच्या दृष्टीने बारामती, कोथरुड, गडहिंग्लज आणि तासगाव या चार शहरांमध्ये नव्या शाखा सुरू करण्याचे नियोजनही जाहीर करण्यात आले आहे.

आभार : सभासदांचा विश्वास आणि सहकार्य यामुळेच संस्थेची ही भरारी शक्य झाल्याचे नमूद करत अध्यक्ष देशपांडे यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!