स्मित किरण पब्लिक स्कूलमध्ये विचारांची अनोखी जागर यात्रा; जयंतीनिमित्त विविध उपक्रम, संविधान व समतेचा संदेश
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील ओंडोशी येथे स्मित किरण पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अत्यंत वेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘बाल आंबेडकर’ बनत सामाजिक जाणीवा जागृत करण्याचा अनोखा संदेश दिला.
संविधान वाचन व बुद्धवंदना : कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संविधानाचे सामूहिक वाचन आणि बुद्धवंदना सादर करण्यात आली. शाळेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘बाल आंबेडकर’ हे दृश्य उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संदेश : केवळ औपचारिक मिरवणुका किंवा उत्सव न साजरे करता, महान व्यक्तींचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवणे गरजेचे असल्याचा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

…तर, समाजात खरा बदल घडेल : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या सचिव डॉ. अंजली देसाई म्हणाल्या, बोधिसत्व गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या थोर विभूतींचे विचार केवळ ऐकण्यापुरते न ठेवता ते अंगीकारणे आवश्यक आहे. सत्य, न्याय आणि समतेचा मार्ग स्वीकारल्यासच समाजात खरा बदल घडू शकतो.
संविधान जनजागृती रॅली : कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची भव्य संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शंभरहून अधिक ‘बाल आंबेडकर’ हातात संविधानाची प्रत घेऊन सहभागी झाले होते. विविध भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत इतर महान व्यक्तींची वेशभूषा साकारत विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला.
खाऊ वाटप : या रॅलीला ग्रामस्थ, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा जागृत होत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
परिश्रम : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक अलका जाधव, प्रभारी अमोल अंबपकर, महेश येडगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मान्यवरांसह ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षणासोबत संस्कारांचा संगम
‘संस्कृत आणि संस्कार’ रुजवत शाळेत पहिली ते दहावीपर्यंत संस्कृत विषयाचे शिक्षण देऊन शंभर गुणांची परीक्षा घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, स्केटिंग, धनुर्विद्या, मिलिटरी अॅडव्हेंचर यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक सक्षमीकरण साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. देसाई यांनी यावेळी नमूद केले.
पोवाडे, गीत, नृत्याविष्कार व प्रश्नमंजुषा
ओंडोशीसह ओंड व उंडाळे गावांत विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करत संविधान, शिक्षण, समता आणि कायद्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र पोवाडा आणि गीतांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह तब्बल दहा भाषांमध्ये भाषणे सादर करत आपल्या कौशल्याची झलक दाखवली. प्रबोधनपर गीतांवर नृत्य आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.
सीबीएससी पॅटर्नवर आधारित शिक्षण देताना विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता त्यांच्यात मूल्यांची जडणघडण करणे महत्त्वाचे आहे. लहान वयातच आचार-विचार आणि संस्कार रुजवले, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंब किंबहुना समाजावर होतो. हा बदल घडवण्याचा खरा राजमार्ग शिक्षणातूनच जातो.
– डॉ. अंजली देसाई (सचिव, स्मित किरण पब्लिक स्कूल, ओंडोशी)











