सातत्यपूर्ण नफा, मजबूत आर्थिक शिस्त आणि आधुनिक सेवांमुळे विश्वासार्हतेला बळ
कराड/प्रतिनिधी : –
कोयना सहकारी बँक लि., कराडने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती करत २०० कोटींच्या पुढे ठेवींचा टप्पा गाठला आहे. बँकेने मार्च २०२६ अखेर २०१.३५ कोटी रुपयांच्या ठेवींची नोंद करत आर्थिक क्षेत्रात आपली भक्कम उपस्थिती पुन्हा अधोरेखित केली आहे.
सातत्यपूर्ण वाढ : लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या प्रेरणेने आणि संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या बँकेने गेल्या तीन दशकांत सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. सन १९९६ मध्ये स्थापन झालेल्या बँकेने आज सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये विस्तार करत १२ शाखांचे जाळे उभे केले आहे. मुख्य कार्यालयही स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीत कार्यरत आहे.
ढोबळ नफा : बँकेच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकल्यास, १४१.१० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, ७०.०७ टक्के सीडी रेशो ही समाधानकारक पातळी राखण्यात आली आहे. काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध कारभाराच्या जोरावर बँकेने १.९५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा आणि ०.९२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच, भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १५.१२ टक्के इतके मजबूत असून, निव्वळ एनपीए २.७७ टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.
‘अ’ ऑडिट वर्ग : बँकेच्या पारदर्शक व जबाबदार व्यवस्थापनाचे प्रतीक म्हणून स्थापनेपासून दरवर्षी ‘अ’ ऑडिट वर्ग मिळत आहे. याशिवाय ग्राहकांना अधिक वेगवान आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी IMPS, मोबाईल बँकिंग आणि UPI यांसारख्या डिजिटल सुविधांचा प्रभावी अवलंब करण्यात आला आहे.
कटिबद्ध : बँकेच्या यशामागे स्व. विलासकाकांचा विचारवारसा आणि ॲड. उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शन असल्याचे अध्यक्ष कृष्णत पाटील यांनी नमूद केले. बँक भविष्यातही ग्राहकांना तत्पर व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबद्ध असून, सभासद व खातेदारांनी बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
…त्यामुळेच बँकेची प्रगती : संचालक मंडळाने विश्वस्ताच्या भूमिकेतून निस्वार्थपणे काम केल्यामुळेच बँकेची प्रगती शक्य झाली असल्याचे उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे यांनी नमूद केले.