“सह्याद्रि”चा बिगुल वाजला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

५ एप्रिलला मतदान; तर ६ रोजी निकाल, निवडणूक बिनविरोध, दुरंगी की तिरंगी याकडे लक्ष

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. हा निवडणूक कार्यक्रम गुरूवार (दि. 27) रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून गुरुवारी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.

एक अर्ज दाखल : सह्याद्रि कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मसूर गटातून विद्यमान संचालक संतोष शिदोजीराव घार्गे (रा. वडगाव जयराम स्वामी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पहिल्या दिवशी एकूण ११ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

३२ हजार २०५ सभासद बजावणार मतदानाचा हक्क : या कारखान्याच्या सभासदांची संख्या ३२ हजार २०५ असून २१ जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया शनिवार (दि. ५) एप्रिल रोजी पार पडणार असून रविवार (दि. ६) एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक राहुल देशमुख व उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.

उच्चांकी इतर देणारा कारखाना : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून सह्याद्रि सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. तसेच ऊसाला उच्चांकी दर देणारा सहकारी साखर कारखाना म्हणूनही या कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाची मुदत संपल्याने पश्चिम महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. 

सह्याद्रिकडे मोर्चा : दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाले. या निकालाला अनेक कांगोरे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांत मुदत संपणाऱ्या आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्रि कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विधानसभा निकालानंतर नवनियुक्त आमदार मनोज घोरपडे यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा आगामी चेअरमन हा सर्वसामान्य शेतकरी असेल, असे जाहीर करून निवडणुकीच्या षड्डू ठोकत सह्याद्रिकडे मोर्चा वळवला आहे.

“काटे की टक्कर” : कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्यामध्ये ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे ही निवडणूक दुरंगी होऊन यामध्ये मोठे रंगत निर्माण होणार असल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते, तसेच कारखान्याच्या सभासदांमध्ये या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नाराज सभासदांची खदखद : कारखान्यास राजकीय द्वेषापोटी वेळेत ऊस गळितासाठी न नेल्याने, मयत सभासदांच्या वारस नोंदी न केल्याने, कारखान्यांच्या पाणीपुरवठा योजनांचे पाणी शेतीस वेळेत न मिळाल्यामुळे, तसेच निवडणुकीत संधी न मिळाल्यामुळे अशा अनेक कारणांनी नाराज असलेल्या सभासदांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तिसरी आघाडी उघडणार? सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांचा हा नाराज गट विरोधकांची हातमिळवणी करणार? की तिसरी आघाडी उघडणार याकडेही सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक कार्यक्रम : सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार (दि २७) फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवार (दि. ५) मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच शुक्रवार (दि. ६) मार्च रोजी छाननी होणार असून वैध उमेदवारांची नावे शनिवार (दि. ७) मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शनिवार (दि. ७) मार्च ते शुक्रवार (दि. २१) मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पात्र उमेदवारांना सोमवार (दि. २४) मार्च रोजी सकाळी ११ वाजता निशाणी वाटप करण्यात येणार असून याच दिवशी उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शनिवार (दि. ५) एप्रिल रोजी कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून रविवार (दि. ६) एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सहकार, जिल्हा व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. 

निवडणूक कार्यक्रमाआधीच आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी

सह्याद्रिच्या पंचवार्षिक निवडणूकच्या दृष्टीने दोन्ही गटातील मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांनी हालचाली सुरू केल्या असून अनेक ठिकाणी कोपरा बैठका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीची वातावरण निर्मिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच झाली असून दोन्हीकडून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे आता अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर सुरू होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीकडेही सभासद, कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.  

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!