प्रा. डॉ. नरेंद्र पाठक; स्मृतिदिनानिमित्त “सावरकर साहित्य – काल, आज, उद्या” विषयावर व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रप्रेमी, ध्येयनिष्ठ व चारित्र्यसंपन्न साहित्यिक होते. त्यांचे विचार सर्वांसाठी आजही प्रेरणास्त्रोत आहेत. जगभरात आजपर्यंत त्यांच्यासारखा प्रतिभावंत साहित्यिक झाला नाही अन् यापुढे होणारही नाही, असे सांगत सावरकर हे साहित्य क्षेत्रातील मानबिंदू आहेत, असे प्रतिपादन साहित्य अकादमी, दिल्लीचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी केले.
व्याख्यान : येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात स्वा. सावरकर स्मारक समितीच्या वतीने सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार (दि. 26) रोजी आयोजित “सावरकर साहित्य – काल, आज, उद्या” विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी होते. प्रमुख उपस्थिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, सीए दिलीप गुरव, उपाध्यक्ष समीर जोशी, तसेच वि. के. जोशी यांच्यासह स्मारक समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.
गीतगायन : कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व ‘स्वरनिनाद’ने सादर केलेल्या सावरकर लिखित सुमधुर गीत गायनाने झाली.

सावरकरांच्या साहित्याचे अधिष्ठान : श्री पाठक म्हणाले, नुकत्याच दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील साहित्यिकांची भाषणं आणि एकूणच त्यांची वैचारिक प्रगल्भता पाहिल्यानंतर स्वा. सावरकरांच्या साहित्यिक अधिष्ठानाचे महत्त्व काय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. लेखक कितीही प्रतिभावंत असला, तरी त्याच्या लेखणीला अन् विचारांना राष्ट्रीय अधिष्ठान नसेल; तर असे विचार काय कामाचे? साहित्यिकांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून समाज जोडायचा असतो. वैभवशाली राष्ट्र उभारायचे असते. असे असताना वर्तमानातील साहित्यिक समाजात भेदभाव निर्माण करत असतील, तर अशाच साहित्यिकांचा समाजरचनेत उपयोग शून्य आहे, अशी टीका श्री पाठक यांनी केली.
साहित्यिकांनी बदनामी केली : मराठी साहित्यिकांनी भाषा आणि साहित्याला एका उंचीवर नेण्याऐवजी त्यांनीच ज्ञान पाजळून साहित्य संमेलनाची बदनामीच केली, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केली.
मराठी मुळातच अभिजात होती : मराठी मुळातच अभिजात भाषा होती. सरकारने फक्त त्या चौकटीत भाषेचा समावेश केला, असे नमूद करत श्री पाठक म्हणाले, अन्य भारतीय भाषा या मराठीच्या भगिनी आहेत. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर इतर भाषांचाही आपण विचार केला पाहिजे. अन्यथा, आपला इतिहास इतर भाषांमध्ये जाणार नाही.
पुरस्कारांच्या थोतांडात अडकू नका : संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना कुणी साहित्य अकादमी पुरस्कार दिला? त्यामुळे मराठी साहित्यिकांनीही पुरस्कारांच्या थोतांडात न अडकता आपली भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही श्री पाठक यांनी केले.
पुरोगामित्व व वास्तववादाचा संगम : सावरकरांचे विचार आणि त्यांचे साहित्य कालजयी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तर त्यांच्या साहित्याने युवकांना राष्ट्रभक्तीने प्रेरित केले होते. त्यांचे लेखन विज्ञाननिष्ठ, हिंदुत्वाच्या तात्विक अधिष्ठानावर आधारलेले आणि भविष्याचा वेध घेणारे आहे. त्यांच्या साहित्यात पुरोगामित्व आणि वास्तववादाचा संगम दिसतो. त्यामुळे आजही वर्तमान परिस्थितीत सावरकरांचे विचार आणि साहित्य हे कालसुसंगत व प्रेरणादायी असल्याची श्री पाठक यांनी सांगितले.
विचारांचे स्फुलिंग तेवत ठेवण्याचे काम : प्रास्ताविकात सीए दिलीप गुरव यांनी स्मारक समितीच्या 42 वर्षांच्या वाटचालीस आढावा घेतला. तसेच सावरकरांच्या विचारांचा अभ्यास, मनन, चिंतन व्याख्यानमालेच्या माध्यमातून करत त्यांच्या विचारांचे स्फुलिंग ठेवत ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त समितीतर्फे विविध शालेय उपक्रम राबवण्यात येतात. स्पर्धेतील निबंधांचे “महामानव” हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण वंदेमातरम् : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर शानभाग व सौ. नेहा अगवेकर, तर अवधूत कुलकर्णी यांनी आभार मानले. सौ. वीणा कळसासी यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदेमातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘भारतरत्न सावरकर’ ओळख राहील
बाळ गंगाधर टिळक आणि मोहनदास करमचंद गांधी यांना “लोकमान्य” आणि “महात्मा” पदव्या या जनतेनेच दिल्या होत्या. त्यामुळे विनायक दामोदर सावरकर यांचा उल्लेख सर्व जनतेनेच “भारतरत्न” असा करावा. सरकार पुरस्काराने त्यांचा गौरव जेव्हा करेल; तेव्हा करेल. परंतु, भारतरत्न म्हणून जनतेने दिलेली पदवी शेवटपर्यंत सावरकरांची ओळख बनून राहील, असे आवाहन श्री पाठक यांनी जनतेला केले.
सावरकर राष्ट्रविचारांचा साहित्य सागर
स्वा. सावरकर हे समाजसेवक, क्रांतिकारी, तत्त्वज्ञ, लेखक, कवी नव्हे; महाकवी होते. त्यांनी अनेक कविता, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ, स्फुटलेखन, पोवाडे, फटका, नाटके, निबंध, आत्मचरित्र, चरित्र आणि पत्रे लिहिलीत. तसेच भाषा आणि लिपी शुद्धीतही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मराठीची पंधरा हजार, तर इंग्रजीची दीड हजार पाने लिहिली. आज सावरकर लिखित 45 पुस्तके व ग्रंथ उपलब्ध असून त्यांनी उर्दू भाषेत गझलही लिहिली आहे. पुढे त्यांच्यावर अनेक साहित्यिकांनी लेखन केले. सावरकरांवर अनेक चित्रपटही निघालेत. त्यामुळे सावरकर म्हणजे राष्ट्रीय विचारांचा साहित्य सागरच असल्याचे मत श्री पाठक यांनी व्यक्त केले.
अर्थविश्वातील चारित्र्यसंपन्न बँक
स्वा. सावरकर स्मारक समितीच्या राष्ट्र उद्धारक कार्याला अनेक अदृश्य हातांची मोलाची मदत मिळत आहे. कराड अर्बन बँकही स्मारक समितीला सर्वतोपरी मदत करत आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रपुरुष, लेखक, साहित्यिक प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न असायला हवेत. तसेच अर्थविश्वात काम करणाऱ्या संस्थाही चरित्रसंपन्न असायलाच हव्यात. १०८ वर्षांचा टप्पा गाठलेली कराड अर्बन बँक हीही अर्थव्यवस्थेतील एक चारित्र्यसंपन्न बँक असून त्यांच्याकडून राष्ट्र उभारणी कार्यात हातभार लागत असल्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी सांगितले.
