कराड/प्रतिनिधी : –
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप, महायुतीला मोठे यश मिळाले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही माझा मोठा विजय झाला. येथील जनतेने मला स्वीकारल्याचा मनस्वी आनंद आहे. परंतु, आता या विजयानंतर काँग्रेसमधील अनेक मोठे नेते माझ्या संपर्कात असून मी त्यांना तूर्तास आहे तिथेच थांबण्याचे सांगितले आहे. ते भाजपमध्ये आल्यास विरोधी नेत्यांकडे कोणीही राहणार नाही, असा खोचक टोला कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.
पत्रकार परिषद : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
भेटीसाठी अनेकजण रात्रभर प्रतीक्षेत : आमदारकीच्या शपथविधीनंतर आपण कराड दक्षिणमधील भाजप व मित्र पक्षांसह विरोधी ग्रामपंचायत आणि नगरपालिका येथील पदाधिकाऱ्यांना बोलावून प्रलंबित कामे व नवीन विकासकामांबाबत प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे अनेकजण मला भेटत आहेत. निवडणूक कालावधीसह निकालानंतरही अनेकजण रात्र – रात्रभर माझी भेट घेण्यासाठी वाट पाहत होते. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याची बाब खरी आहे. मात्र, आपण अनेकजणांना तूर्तास आहे, त्याच ठिकाणी थांबण्याचे सांगितले आहे. यासंदर्भात आमच्या कार्यकर्त्यांची आधी चर्चा करावी लागेल, त्यांची समजूत काढावी लागेल. त्यानंतरच आपण काहींच्या पक्षप्रवेशाबाबत विचार करू, असे सूचक विधानही यावेळी यावेळी केले.
मिनी एमआयडीसीसाठी प्रयत्नशील : कराड दक्षिण मतदारसंघासह तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टार दर्जा मिळवण्यासह याठिकाणी मिनी एमआयडीसी करण्याच्या संदर्भात माझे प्रयत्न आहेत. यादृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. ते लवकरच कराडला येणार असून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. तत्पूर्वी, कराडच्या जुन्या एमआयडीसीमध्ये सध्या असलेल्या उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्याकडून त्याठिकाणच्या समस्या जाणून घेणार आहे. याठिकाणी आवश्यक सोय सुविधा मिळाल्या, तरच नवीन उद्योजक आपल्या एमआयडीसीला पसंती देतील.
1300 लोकांना रोजगार : एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपनीशी आपली चर्चा झाली असून त्यांच्याशी आपण कराडच्या एमआयडीसीमध्ये प्लांट सुरू करण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले म्हणाले, असे झाल्यास याठिकाणी 1300 जणांना रोजगार मिळेल. नवीन उद्योग कराडला येण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले कराड विमानतळ विस्तारीकरणही आपण समन्वयातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
म्हाडातून दर्जेदार घरे : कराड शहरातील पाटण कॉलनी, शिवाजी स्टेडियम व मलकापूर झोपडपट्टीबाबत बोलताना ते म्हणाले, पाटण कॉलनीतील झोपडपट्टीच्या जमिनीवरील पार्किंगची लँड परमिशन चेंज करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला असून त्यास त्यांनी तात्काळ मान्यता दिली आहे. त्यामुळे आता याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेपेक्षा दर्जेदार घरे निर्माण करून येथील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहे. परंतु, पन्नास वर्षे घरात सत्ता असतानाही येथील लोकप्रतिनिधींना त्यांच्या घराशेजारील झोपडपट्टीचे पुनर्वसन करता आले नाही, अशी टीकाही त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.
यशवंत नगरीतील एकही कुटुंब बेघर राहणार नाही : शिवाजी स्टेडियमजवळील झोपडपट्टीलगत मुस्लिम दफनभूमी असून याठिकाणी दोन्ही समाजात समन्वय साधून तोडगा काढत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर कराड येथील झोपडपट्टी वाशियांचे मलकापुरमध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र, ती जमीन कराड नगरपालिकेच्या नावे होती. तेही आपण चेंज करून घेतले असून त्याचा सातबारा आता मलकापूर नगरपालिकेच्या नावाने झाला आहे. त्यामुळे येथील पुनर्वसनही मार्गी लागेल, असे सांगत यशवंतराव चव्हाण यांच्या नगरीसह कराड दक्षिणमधील एकही कुटुंब बेघर राहणार नाही, अशी ग्वाहीही आ. भोसले यांनी यावेळी दिली.
नेकलेस रोडसाठी आग्रही : कराड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, पुणे – बंगळुरू महामार्गावरील पंकज हॉटेलपासून नदीकाठी असलेल्या गॅबियन भिंतीलगत नेकलेस रोड तयार करून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच या भिंतीची उंची वाढवून पूर संरक्षणाच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच खोडशी येथे नवीन फुल उभारून विटा, पंढरपूरकडे जाणारी वाहतूक त्यामार्गे वळवण्यात येईल. त्याचबरोबर पाचवडेश्वर येथील पूल पूर्णत्वास नेऊन तासगावकडे जाणारी वाहतूक त्यामार्गे वळवण्यात येईल. यामुळे कराड शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.
वारुंजी बंधारा मार्गी लावू : कराड व मलकापूर शहराला होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात वारुंजी बंधारा होणे महत्त्वाचे आहे. याकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी अडवल्यामुळे त्याची फुग जवळपास वारुंजीपर्यंत जात असल्याने पाणी दूषित होते. याचा नागरिकांना त्रास होतो. यासाठी वारुंजी येथे नदीवर प्रलंबित असणाऱ्या बंधाराचे काम मार्गी लावून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धार्मिक पर्यटनाला चालना : कराड शहरातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले म्हणाले, येथील वीर मारुती मंदिर पुरातन असून त्याचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने आपण मंदिराला भेट दिली आहे. शिवाय शहरातील कृष्णामाई मंदिर, ज्योतिबा मंदिर व अन्य महत्वाच्या मंदिरांचेही जतन व संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे. या माध्यमातून आपण मंदिरांना क वर्ग व ब वर्ग दर्जा देऊन कराडच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच येथील उत्तरालक्ष्मी मंदिराचा प्रश्न संवेदनशील असून दोन्ही समाजाशी आपण समन्वयातून चर्चा करून कोणत्याही प्रकारे वाद विवाद न होता हा प्रश्न मार्गी कसा मार्गी लावता येईल, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.