मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; सातारा जिल्हा दुष्काळमुक्त होईल – मंत्री जयकुमार गोरे
कराड/प्रतिनिधी : –
अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना
का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही. परंतु, यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याचे मोठे नुकसान झाले. कर्तुत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलने हा भाऊसाहेब महाराजांवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
अभिवादन : नुकतीच राज्याच्या सार्वजनिक मंत्री पदाची धुरा मिळाल्यानंतर येथील प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी मंगळवारी त्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजेश पाटील – वाठारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजप तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सारिकाताई गावडे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मंत्री जयकुमार गोरे यांचे यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी स्वागत केले.
…त्यामुळे चार मंत्रीपदे मिळाली : यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची उभारणी केली. त्यांच्या प्रेरणेने व विचारांवर भाऊसाहेब महाराजांनंतर आम्ही मार्गक्रमण करत करत असल्याचे सांगत मंत्री अभयसिंहराजे म्हणाले, साताऱ्याने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा हा आता भाजप, महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळेच आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी भाजप व मित्रपक्षांना मिळून तब्बल चार मंत्रीपदे दिली असून आम्ही सर्वजण मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार आहोत. यासाठी चव्हाण साहेबांचे आशीर्वाद व प्रेरणा घेऊन आम्ही कामाला सुरुवात करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री पदाबाबत चर्चा नाही : पालकमंत्री पदाबाबत आपल्या नावाची चर्चा? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, पालकमंत्री पदासाठी सध्या कोणाच्याही नावाची चर्चा नसून याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतील, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जिल्ह्यात रस्त्याचे चांगले जाळे निर्माण करणार असून सर्वांनी बांधकाम विभागाची सर्व कामे, रस्ते, पूल आदी कामे दर्जेदारपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर उदयनराजे आणि आपल्यातील वाद संपुष्टाचा आला आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, आम्हा दोघांमध्ये कधीही वाद नव्हता. नगरपालिका निवडणुकीवेळी एका वार्डात दोन्हीकडील कार्यकर्ते इच्छूक असल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवले. परंतु, भविष्यात आता अशा प्रकारचे वाद होणार नाहीत, असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
माण – खटावचा दुष्काळ हटवता आला नाही : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नवजा व महाबळेश्वर येथे पाऊस पडतो. तर सर्वात कमी पाऊस माण – खटाव व खंडाळा विभागात पडत असल्याचे सांगत मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्याने अनेक नेत्यांवर प्रेम केले. तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्रीपद तब्बल 19 वर्ष जिल्ह्याकडे होते. तरीही माण – खटावचा दुष्काळ आपण संपवू शकलो नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण अनेक योजना मार्गी लावली असून येथील दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार वर्षात सातारा जिल्हा दुष्काळमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उरमोडी प्रकल्प मार्गी लावला
भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी प्रकल्प मार्गी लावला. त्यामुळे मोठे क्षेत्र आज सुजलाम, सुफलाम झाले आहे. त्यांना अधिक संधी मिळाली असती, तर सातारा जिल्ह्यासह राज्याचाची चांगला विकास झाला असता, अशी खंतही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष हवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे का? या प्रश्नावर बोलताना मंत्री भोसले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या सूचना देतील, त्यानुसार आम्ही वाटचाल करू. परंतु, जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष झाला पाहिजे, अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
फलटण कोणाची जहागिरी नाही
रामराजे आणि तुमच्यातील वादावर पडदा पडला आहे का? या प्रश्नावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले, रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे त्यांना स्वतःला माहित आहे का? मला तरी माहित नाही. आमच्यातील वाद वैचारिक होता. परंतु, फलटण म्हणजे कोणाची वैयक्तिक जहागिरी नाही. जनता हीच फलटणची जहागिरी आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.