महायुतीतर्फे भाजपचे कराड दक्षिणमधील अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून या सभेस कार्यकर्ते व जनतेने मोठ्या उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील यांनी केले आहे.
शुक्रवारी प्रचारसभा : ही प्रचारसभा मलकापुरातील बैल बाजार रोडवरील श्री गणपती मंदिरामागील भव्य पटांगणावर शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रचारात आघाडी : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या प्रचारात महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
प्रचार सभांचा धडाका : डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका सध्या कराड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. नुकतीच विंग (ता. कराड) येथे केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांची अलोट गर्दीत जाहीर प्रचार सभा पार पडली. त्यानंतर ओंड (ता. कराड) येथे चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत मोठा महिला मेळावाही पार पडला. आता मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या प्रचारसभांचा भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच फिव्हर असल्याचे दिसून येत आहे.
घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती : या सभेला जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन पै. धनंजय पाटील यांनी केले आहे.