सतेज उर्फ बंटी पाटील; विठ्ठल चौक व आंबेडकर चौकात जाहीर सभा
कराड/प्रतिनिधी : –
थोर नेते यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्यासारख्या सोज्वळ नेतृत्वांनी कराडला पुढे नेण्याचे काम करून महाराष्ट्राच्या राजकारणात कराडची एक वेगळी ओळख निर्माण केली. पृथ्वीराजबाबांनी कराडची हीच ओळख विकासात्मक कार्यातून पुढे नेली. त्यांनी मुख्यमंत्री असताना कराडसह महाराष्ट्रात मोठी विकासकामे केली असून त्यांना पुन्हा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आपण मतदानातून द्यावी, असे आवाहन माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
प्रचार सभा : कराड शहरातील विठ्ठल चौक व आंबेडकर चौकात महायुतीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी प्रकाश नहाटा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खा. चंद्रकांत हंडोरे, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विरोधकांकडे सांगण्यासारखे स्वकर्तृत्व नाही : पृथ्वीराज चव्हाण यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेला दबदबा सांगताना बंटी पाटील म्हणाले, आपणा सर्वांना अभिमान वाटावा अशी राज्य आणि देशात पृथ्वीराजबाबांची ओळख आहे. परंतु, विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीही स्वकर्तृत्व नाही. त्यामुळे ते पैशांचा वापर करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता विरोधकांचा कंडका पाडा, घणाघातही त्यांनी यावेळी केला.
भाजपचा डाव ओळखा : भाजपकडून जाती जातीत, धर्मात द्वेष पसरवला जात असून हा त्यांचा डाव आपण ओळखला पाहिजे, असे मत लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
बाबांनी बहुजन हित जोपासले : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आयुष्यभर बहुजन हिताचा विचार जोपासला. त्यांचा विचार आणि ध्येय हे कराडच्या विकासासाठी कायम राहील. राज्याला पुन्हा त्यांच्यासारखे नेतृत्व लाभण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन खा. चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले.













