मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संविधान बदलण्याच्या थापा मारून लोकांची फसवणूक
कराड/प्रतिनिधी : –
सरकारने लाडक्या बहिणींना प्रतिमहा दीड हजार दिल्याने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. परंतु, ही योजना बंद होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीला न्यायालयाने चपराक दिली. तसेच आमचे सरकार आल्यावर या योजनेची चौकशी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी कितीही चौकशा लावाव्यात. आपण शंभर वेळा तुरुंगात जायला तयार आहोत. मीही शेतकऱ्याचा मुलगा असून दूध उत्पादक, शेतकरी कुटुंबाला हातभार लावण्याचा माझा प्रयत्न आहे. दिलेला शब्द पाळणारा मी मुख्यमंत्री असून ही देना बँक आहे, विरोधकांसारखी लेना बँक नव्हे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
तांबवे येथे प्रचारसभा : तांबवे (ता. कराड) येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील ‘महायुती’तर्फे शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते व लोकांची मोठी उपस्थिती होती.
आमचे सरकार हप्ते देणारे :पूर्वीचे सरकार सरकार हप्ते घाणारे सरकार होते. मात्र, आपले सरकार हे हप्ते देणारे सरकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने सिंचनाच्या केवळ 2 प्रकल्पांना मान्यता दिली. तर, आपण 162 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. लाडक्या बहिणींनी या निवडणुकीत ताकद दिल्यास दीड हजाराचे दोन- अडीच नव्हे; तर तीन आणि त्यापेक्षाही ज्यादाची रक्कम दर महिन्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे.
जनतेला योजनांचा लाभ : सरकारने जनतेला दिलेल्या योजनांच्या लाभाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जनधन योजना, स्वनिधी, उज्वला योजना, मोफत धान्य, महिलांना मोफत प्रवास, मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, कृषीपंपाचे वीज बिल माफ, दोन वर्षांत शेतकऱ्यांना 25 हजार कोटींची नुकसान भरपाई, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार इन्सेंटिव्ह, वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना 3 हजार रुपये, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत नवीन उद्योजकांना अर्थसहाय्य आदींच्या माध्यमातून सरकारने सर्वांना लाभ दिला आहे.
मतांचा पाऊस पाडून रेकॉर्ड मोडा : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून शंभूराज देसाई यांची वाटचाल सुरू असल्याचे गौरवोद्गार काढत श्री. शिंदे म्हणाले, शंभूराज देसाई यांच्यासारख्या लोकाभिमुख, कार्यक्षम नेतृत्वाने पाटण मतदारसंघात विकासकामांसाठी 2,920 कोटी रुपये आणण्याचा विक्रम केला आहे. शिवसेनेतील बंडावेळी शंभूराज देसाई यांनी सर्वांपुढे आघाडी घेतली. म्हणूनच अशा कार्यक्षम नेतृत्वावर मी सातारा व ठाणे अशा दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. आता तुमची वेळ असून या निवडणुकीत पाटण मतदारसंघात मतांचा पाऊस पाडून जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढा, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जनतेला केले.
विकासकामांच्या आधारे निवडणूक लढवतोय : ही निवडणूक आपण विकासकामांच्या आधारे लढवत असल्याचे सांगत शंभूराज देसाई म्हणाले, 2014 आणि 2019 या 10 वर्षांत मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, गावे, वाड्या-वस्त्यांवर पायाभूत सुविधा व अद्यावत विकास करण्याचे ध्येय राहिले. या विकासकामांचा लेखाजोखा आपण मतदारांसमोर ठेवलाय. केंद्र सरकार राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदारसंघासाठी सढळ हाताने निधी दिला. आता त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण पुन्हा मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर या
विरोधकांनी संविधान बदलले जाणार असल्याचा खोटा प्रचार करून, लोकसभेला महाराष्ट्रात आघाडी घेतली. परंतु, अशाप्रकारे जनतेची फसवणूक करून, दरवेळी निवडणूक जिंकता येत नाहीत, असा घणाघात करत राज्य सरकार म्हणून केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर समोरा- समोर या, असे खुले आव्हानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिले.
विलासकाकांनी विकासकामांचे स्वप्न दाखवले
विलासकाकांनी 35 वर्ष कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्यांनी सुपने – तांबवे भागातील गावांसह डोंगरी भागाला विकासकामांचे स्वप्न दाखवले. परंतु, 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत सुपने – तांबवे जिल्हा परिषद गट पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला. त्यानंतर आपण काकांची भेट घेतली. यावेळी काकांनी आपण विकासकामांवर येथील माणसे जोडली असून तीच परंपरा तुम्हाला पुढे चालवायची असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आपण या भागात अनेक विकासकामे केली असून नेहमीच झुकते माप दिल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.