जातीयवादी पक्षाला रोखून परंपरा जपूया

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. पृथ्वीराज चव्हाण; येळगावला प्रचार सभा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : –

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुती पराभव केला. या निवडणुकीत 48 पैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे, यात शंका नाही. या सरकारमध्ये कराड दक्षिणचा सहभाग असण्यासाठी जनतेने जातीयवादी पक्षाला रोखून कराड दक्षिणची परंपरा जपूया, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

येळगाव येथे प्रचार सभा : येळगाव (ता. कराड) येथे प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी अॅड उदयसिंह पाटील – उंडाळकर, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पै. तानाजी चवरे, पंचायत समितीच्या माजी सभापती फरिदा इनामदार, किसनराव जाधव, सरपंच अनुराधा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

खाजगी संस्थांद्वारे जनतेची पिळवणूक : दक्षिणेतील विरोधकांनी खाजगी संस्थांद्वारे अर्थकारण करत जनतेची पिळवणूक केल्याचा आरोप करत आ. चव्हाण म्हणाले, सहकारी संस्था खाजगी करण्याची त्यांची दृष्टी जनतेने ओळखली आहे. त्यांना समाजापेक्षा आपला व्यक्तिगत विकास महत्वाचा वाटत असून जनतेनेही आपला स्वाभिमान जपला पाहिजे. सध्या निवडणुकीच्या तोंडावर कराड दक्षिणमध्ये काहींनी विकासाची केवळ बॅनरबाजी केली असून हे न समजण्याइतकी लोकं दूधखुळी नाहीत.

‘रयत’पेक्षा इतर कारखान्यांचा ऊस दर कमी का? : विरोधकांनी लोकांच्या जीवावर उभ्या केलेल्या संस्था काँग्रेसच्या देण असल्याचे सांगत अॅड उदयसिंह पाटील म्हणाले, त्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैशांतून तयार झाल्या आहेत. रयत कारखाना उसाला 3150 रुपये दर देतो. मग 50 वर्षांपासून सुरू असलेले कारखाने 3100 रूपये दर देतात, हे कशाचे द्योतक आहे. यावरून सामान्य माणसाच्या हातात अर्थकारण जाऊ नये, ही त्यांची विचारसरणी स्पष्ट होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले

मान्यवरांची भाषणे : अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, शेवाळे गुरुजी, संतोष थोरवडे यांची भाषणे झाली. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी चवरे यांनी आभार मानले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!