उंडाळे पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित कामांवर लवकरच विशेष बैठक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत ग्वाही

कराड/प्रतिनिधी : –

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी बोलावण्यात येईल आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा मांडला मुद्दा : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात मांडला. या योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झाला असून, केवळ २० टक्के काम बाकी आहे. उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्यास ही योजना अल्पावधीत पूर्ण होऊन कार्यान्वित होऊ शकते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

तातडीने बैठकीची मागणी : या योजनेमुळे परिसरातील तब्बल १८ गावांना पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत विविध विभागांमधील समन्वय साधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.

सूचना : यावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन संपण्यापूर्वीच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनेतील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला जाईल. तसेच कामे लवकर पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

कामाला गती मिळण्याची शक्यता : दरम्यान, या निर्णयामुळे उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता या भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!