५ एप्रिलला मतदान; तर ६ रोजी निकाल, निवडणूक बिनविरोध, दुरंगी की तिरंगी याकडे लक्ष
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. हा निवडणूक कार्यक्रम गुरूवार (दि. 27) रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून गुरुवारी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
एक अर्ज दाखल : सह्याद्रि कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मसूर गटातून विद्यमान संचालक संतोष शिदोजीराव घार्गे (रा. वडगाव जयराम स्वामी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पहिल्या दिवशी एकूण ११ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
३२ हजार २०५ सभासद बजावणार मतदानाचा हक्क : या कारखान्याच्या सभासदांची संख्या ३२ हजार २०५ असून २१ जागांसाठी होणार्या या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया शनिवार (दि. ५) एप्रिल रोजी पार पडणार असून रविवार (दि. ६) एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक राहुल देशमुख व उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.
उच्चांकी इतर देणारा कारखाना : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून सह्याद्रि सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. तसेच ऊसाला उच्चांकी दर देणारा सहकारी साखर कारखाना म्हणूनही या कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाची मुदत संपल्याने पश्चिम महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.













