पृथ्वीराज चव्हाण यांना जनतेनेच रिटायर करावे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान; महायुतीचा डॉक्टर संवाद मेळावा उत्साहात 

कराड प्रतिनिधी : – 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली, ती सांगावीत. 2014 ते 2024 पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, ती मी पुराव्यांनिशी दाखवतो. त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नाही. त्यांचे आता वय झाले आहे. त्यांच्यासारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करून डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

कराड : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत डॉ. सुरेशबाबा भोसले व मेळाव्यास उपस्थित कराड दक्षिणमधील डॉक्टर्स.

कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा : महायुतीतर्फे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे त्यांची प्रमुख उपस्थिती होती. 

काँग्रेस -भाजप तुलनेतून विकास कळेल : देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली या 60 वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. 

कराड : मेळाव्यास उपस्थित डॉक्टर्सना संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

काँग्रेसने जनतेला केवळ हात दाखविण्याचेच काम केले : काँग्रेसने गरीबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला? असा सवाल उपस्थित करत डॉ. सावंत म्हणाले, त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 100 रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र, त्यांच्या हातात केवळ 20 रुपयेच पडायचे. उरलेले 80 रुपये काँग्रेसचे दलाल खात होते. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड, उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन आदींच्या माध्यमातून गरीब कल्याण, तसेच महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केली. याउलट काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखविण्याचेच काम केले. त्यांनी कोणाच्याही हाताला काम दिले नाही. मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबवले. ‘आयुष्यमान भारत’च्या माध्यमातून लोकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले. 2014 पूर्वीपर्यंत काँग्रेसच्या काळात आपल्याला किती आरोग्य सुविधा मिळाल्या, याचाही लोकांनी विचार करावा. 

विकसित भारत व महाराष्ट्र साकारूया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची ताकद संपूर्ण जगाला दाखवल्याचे सांगताना डॉ. सावंत म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. सर्जिकल स्ट्राइक केला. राम मंदिर उभारणी केली. तब्बल 180 देशात योग पोहोचवला. येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या नंबरवर असेल. काँग्रेसच्या काळात देशात 387 मेडिकल कॉलेजेस होती. मोदींच्या काळात ती 750 वर झाली असून अन्य मेडिकल शाखांचाही मोठा विस्तार झाला असून मोदींनी नवभारत निर्मिती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती, गरीब कल्याणासाठी, तसेच विकसित भारत व विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी मोदींचे हात बळकट करणे गरजेचे आहे. 

डॉ. सुरेश भोसले, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची भाषणे झाली. या मेळाव्याला कराड दक्षिणमधील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले 

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा विकास रोखला, असा आरोप करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजप – शिवसेनेने हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, यश मिळवले. परंतु, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले. त्यांनी पुत्रासाठी युतीधर्म तोडून महाराष्ट्राचा विश्वासघात केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धाडसी पाऊल उचलत महाराष्ट्राचे विकासाला गती दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!