गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान; महायुतीचा डॉक्टर संवाद मेळावा उत्साहात
कराड प्रतिनिधी : –
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली, ती सांगावीत. 2014 ते 2024 पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, ती मी पुराव्यांनिशी दाखवतो. त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नाही. त्यांचे आता वय झाले आहे. त्यांच्यासारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करून डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा : महायुतीतर्फे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेस -भाजप तुलनेतून विकास कळेल : देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली या 60 वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.













