डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरण; राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यवरांचा सहभाग
कराड/प्रतिनिधी : –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराडमधील भवानी शाखेस दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी ‘बंधुता परिषद २०२६’ या दुसऱ्या बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराडचे अध्यक्ष विजय जोशी यांनी दिली.
पत्रकार परिषद : या बंधुता परिषदेची माहिती देण्यासाठी मंगळवारी येथील अण्णा भोई स्मृती भवन, रा. स्व. संघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह वैभव डुबल, कराड कार्यवाह महंतेष तुळजनवर, प्रचार प्रमुख सुयोग किरपेकर आदी उपस्थित होते.
परिषदेचा उद्देश : पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेला एकता, समता व बंधुतेचा संदेश अधिक व्यापकपणे रुजावा, या उद्देशाने ही विचार परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे सांगताना श्री. जोशी म्हणाले, ज्या ऐतिहासिक भवानी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती, त्याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
प्रमुख वक्ते : या परिषदेसाठी भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांची विचारमंचावर विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्व : या परिषदेमध्ये समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व अनेक मान्यवर सहभागी होणार असून, सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
वेळ व ठिकाण : ही बंधुता विचार परिषद शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता, भवानी मैदान, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे संपन्न होणार आहे.
आवाहन : समाजात एकता, बंधुता व समतेचा विचार अधिक बळकट व्हावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या वैचारिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह वैभव डुबल, तसेच आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.