कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

२० टक्के सर्वाधिक उपक्रमशील ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष – प्रताप पाटील

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र शासनाने प्रथमच राबवलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान या अभिनव स्पर्धेत कराड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती सहभागी झाल्या असून, त्यामधील सर्वाधिक उपक्रमशील २० टक्के ग्रामपंचायतींवर पंचायत समितीचा विशेष फोकस असल्याची माहिती कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान लाईव्ह मॉडेल : कराड बाजार समिती, जिल्हा परिषद व राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बैल बाजार तळावर सुरू असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाचे लाईव्ह मॉडेल उभारण्यात आले आहे. या मॉडेलची माहिती देताना प्रताप पाटील बोलत होते. यावेळी कृषी अधिकारी पवन गायकवाड उपस्थित होते.

१५७ कोटी रुपयांची बक्षिसे : गटविकास अधिकारी प्रताप पाटील म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत राज्यभरातील गुणवंत ग्रामपंचायतींना एकूण १५७ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून, राज्यात प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला ५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास १५ लाख, द्वितीय क्रमांकास १२ लाख, तर तृतीय क्रमांकास ८ लाख रुपये बक्षीस दिले जाणार असून जिल्हास्तरावरही स्वतंत्र बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे.

आठ निकषांवर आधारित गुणांकन : कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या अभियानात सहभागी असल्या तरी, आठ निकषांवर आधारित गुणांकन पद्धतीनुसार सर्वाधिक गुण मिळवू शकणाऱ्या ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रित करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या ग्रामपंचायती तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष प्रयत्न : या अभियानाची जनजागृती गावागावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये लाईव्ह मॉडेलच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सहकार्याने तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

राज्यात वेगळा ठसा उमटवेल : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात कराड तालुका राज्यात वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वासही गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी व्यक्त केला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!