सहकार वृद्धिंगत करण्यासाठी सभासद हेच दीपस्तंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अशोकराव थोरात; सहकार परिषदेचा समारोप, उच्चशिक्षित तरुणांची सहकार क्षेत्रात नितांत गरज

कराड/प्रतिनिधी : –

सहकार टिकवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी सहकारी संस्थांचे सभासद आणि पदाधिकारी हेच दीपस्तंभासारखे कार्य करतात, असे प्रतिपादन मळाई ग्रुपचे प्रमुख शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केले.

चौथी सहकार परिषद : श्री मळाई ग्रुप, मलकापूर (कराड) आणि कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २७) आयोजित पश्चिम महाराष्ट्र चौथ्या सहकार परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

मुख्य हेतू : सहकार क्षेत्रातील सद्यःस्थिती, समस्या आणि भविष्यातील दिशा यावर परखड चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सहकाराचे अध्यापन करणारे प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, सहकार क्षेत्रातील शासकीय अधिकारी व अभ्यासक यांच्यात विचारमंथन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य हेतू असल्याचे श्री. थोरात यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचारामुळे सहकार कमकुवत : सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेसाठी उच्चशिक्षित तरुणांची सहकार क्षेत्रात नितांत गरज असल्याचे सांगत अशोकराव थोरात म्हणाले, वाढती अपप्रवृत्ती, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे सहकार चळवळ कमकुवत होत आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते सुरू केल्याने देशातील सहकार चळवळीवर होणाऱ्या परिणामांबाबत संभ्रम आहे. गेल्या २० ते ३० वर्षांत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधोगतीकडे जात असून, ते टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि सखोल विचारमंथन आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती : परिषदेचे उद्घाटन राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी होते. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख सुभाष दगडे, अधिष्ठाता मानव्यविद्याशाखा डॉ. अनिल वावरे आणि सहाय्यक निबंधक बाबुराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुदृढ कायदेशीर वातावरणाची गरज : पहिल्या सत्रात नवीन सहकार धोरणावर बोलताना सुभाष दगडे यांनी, सहकाराच्या मजबुतीसाठी स्वायत्तता, पारदर्शकता, सुशासन, समान संधी आणि सुदृढ कायदेशीर वातावरणाची गरज अधोरेखित केली. ‘मी’ ऐवजी ‘आपण’, ‘माझी’ ऐवजी ‘आमची’, खासगीकरणाऐवजी सहकारीकरण आणि एकाधिकारशाहीऐवजी लोकशाही या मूल्यांवर सहकाराची वाटचाल व्हावी, असे त्यांनी सांगितले.

बँकांसमोर थकीत कर्जाचे आव्हान : दुसऱ्या सत्रात डॉ. अनिल वावरे यांनी, महाराष्ट्रातील सहकार चळवळीने ग्रामीण व निमशहरी विकासात बजावलेल्या भूमिकेचा आढावा घेतला. साखर कारखाने व दुग्ध सहकारी संस्थांमध्ये सुधारणा दिसून येत असल्या तरी, नागरी सहकारी बँकांसमोर थकीत कर्जाचे मोठे आव्हान आहे. राजकीय हस्तक्षेप कमी करून आर्थिक पारदर्शकता वाढविल्यास सहकार क्षेत्र भविष्यात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरेल, असे मत व्यक्त केले.

कायदा व लेखा परीक्षकाची भूमिका : सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणावर बोलताना बाबुराव शेळके यांनी, सहकारी संस्थांची स्थापना, नोंदणी प्रक्रिया, लेखापरीक्षण कायदा व लेखा परीक्षकाची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

‘सहकारा’तील गुणवंतांचा सन्मान : परिषदेत बारावीच्या परीक्षेत सहकार विषयात ९५ पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती : यावेळी प्रा.डॉ. शरद शेटे, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, नवनियुक्त नगरसेविका डॉ.सौ. स्वाती रणजीत थोरात, नगरसेवक भीमराव माऊर, मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अजितकाका थोरात, प्रा.आर.डी. पाटील, प्रा. सतीश जंगम यांची उपस्थिती होती.

सहकार गीत : संगीत शिक्षक शरद तांबवेकर व त्यांच्या वाद्यवृंदाने सहकार विषयावरील गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. शीला पाटील यांनी केले. तर आभार प्रा.एस.एस. पाटील यांनी मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!