महिलांचा भक्कम आधार : सौ. मधुराणी आनंदा थोरात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

एक संवेदनशील नेत्या, सामाजिक चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व आणि हजारो महिलांचे आयुष्य प्रकाशमय करणारे व्यक्तिमत्व

कौशल्य प्रशिक्षणातून महिला उद्योजिका घडविणे, वंचित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, संविधान जागृतीचा दीप प्रत्येक घरात लावणे आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणे, ही सौ. मधुराणी आनंदा थोरात (वय 43) यांची कार्यशैली. अलीकडेच त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि सेवाकार्याचा घेतलेला हा प्रभावी आढावा म्हणजेच समाजासाठी त्यांनी सोडलेल्या प्रेरणादायी वारशाला विनम्र अभिवाद..! 

समाजासाठी जगलेल्या व्यक्तिमत्वाची अनोखी ओळख : महिला हक्क, संपत्ती अधिकार, लोकसहभागातून पाणी चळवळ, संविधान जागृती, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन… अशी अनेक आघाड्यांवर त्यांनी नेतृत्व करत महिलांना बळकट करण्याचा ध्यास घेतला. ज्ञानदीप कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या म्हणून त्यांनी हजारो महिलांना उद्योजकतेकडे नेणारा मार्ग दाखविला. ग्रामीण वाडी – वस्त्यांपर्यंत जाऊन त्यांनी महिला सक्षमीकरणाचा दीप प्रज्वलित केला. 

2009 पासून सामाजिक परिवर्तनाची सशक्त वाटचाल : ओंड, ता. कराड येथून 2004 मध्ये सुरु झालेल्या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेत संस्थापक अध्यक्ष आनंदा बाबुराव थोरात यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून 2009 पासून मधुराणी थोरात यांनी आरोग्य, शिक्षण, महिला-बालकल्याण, पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या शेकडो उपक्रमांचे नेतृत्व केले. कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत त्यांनी चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातर्गत गावोगावी प्रशिक्षण देत महिलांना व्यवसाय उभारणीपासून डिजिटल साक्षरतेपर्यंत आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य हाती घेतले.

एकल महिलांसाठी उभा राहिलेला आधारस्तंभ : समाजात आजही उपेक्षित समजल्या जाणाऱ्या विधवा, घटस्फोटित, परितक्त्या महिलांचे संघटन उभे करून त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्याची ऐतिहासिक चळवळ त्यांनी सुरु केली. कापिल, गोळेश्वर आणि कराड तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘एकल महिला संघटन’ उभारून त्यांनी महिलांच्या आत्मविश्वासाला दिशा दिली. बचत गट, आरोग्य, शिक्षण व उपजीविकेसाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी या महिलांना स्वावलंबनाचा हात दिला.

महिलांचा संपत्तीवरील अधिकार – परिवर्तनाची चळवळ : महिलांना संपत्तीचा कायदेशीर हक्क समजावून सांगणे, 8 अ उतारा, सातबारा उतारा वाचन, संयुक्त घर मालकी हक्क, लक्ष्मीमुक्ती योजना आणि विवाह नोंदणीचे महत्त्व याबाबत सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रभावी कार्यशाळा घेतल्या. गावोगावी जाऊन संपत्ती हक्कावर महिलांना सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न समाजपरिवर्तनाची पायाभरणी ठरला.

संविधान जागृती – ‘हर घर संविधान’ अभियान : समाजात संविधानिक मूल्यांबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी मुलींच्या वसतिगृहांमध्ये समता क्लब स्थापन केले. व्याख्याने, खेळ, गाणी, संवाद, कार्यशाळा यांद्वारे त्यांनी जनतेपर्यंत संविधानाची व्याप्ती पोहोचवली. ‘हर घर तिरंगा – हर घर संविधान’ हा त्यांचा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

पंचायत राज आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान : 

  • कराड पंचायत समितीमध्ये महिला तक्रार निवारण समिती सदस्य

  • रोजगार हमी योजनेसाठी सीआरपी म्हणून काम

  • यशदा अंतर्गत ग्रामविकास आराखडा प्रशिक्षक

  • ‘आशाकिरण’ महिला वसतिगृहात समुपदेशक

  • नेहरू युवा केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग

  • समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी शासन योजनांचा लाभ पोहोचविण्याची त्यांची तळमळ हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.

आरोग्य, पर्यावरण आणि पोषण जागृतीतील सशक्त भूमिका : २५ गावांमध्ये सेंद्रिय परसबाग प्रकल्प, कुपोषण निर्मूलन, किशोरवयीन मुली व गरोदर माता यांना पोषण मार्गदर्शन, रक्तक्षयमुक्त भारत अभियानात सहभाग या उपक्रमांनी त्या ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील प्रकाशस्तंभ ठरल्या. कोविड काळात मास्क प्रशिक्षण, कोविड केअर सेंटर उभारणी, शासकीय यंत्रणेला मास्क पुरविणे… या कार्यामुळे त्यांनी संकट काळातही समाजासाठी रात्रंदिवस सेवा दिली.

‘ज्ञानदीप’ जगी लावणाऱ्या समाजसेविका :  संत नामदेव महाराजांचे अभंग; “नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी…” यातील शिकवण जणू मधुराणी थोरात यांनी प्रत्यक्ष कार्यातून जगविली. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, जलसाक्षरता, कृषी, उपजीविका, सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रांत नावीन्यपूर्ण कार्य करीत त्यांनी समाज प्रबोधनाचा ‘ज्ञानदीप’ जपला. त्यांच्या कार्यामुळे ज्ञानदीप संस्थेला राज्यभरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही प्रतिष्ठा मिळाली. त्यांना मिळालेला युवा गौरव पुरस्कार हा त्यांच्या व्यापक योगदानाचा मानचिन्ह ठरला.

मधुराणी थोरात यांच्या समाजपरिवर्तनाच्या उपक्रमांचा संक्षिप्त आढावा : 

  • ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्र

  • कौशल्य प्रशिक्षणातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

  • एकल महिलांचे संघटन

  • महिलांचा संपत्तीवरील अधिकार चळवळ

  • संविधान जागृती अभियान

  • न्याय – हक्कांवरील मार्गदर्शन

  • विशाखा समितीची अंमलबजावणी

  • शिक्षण, आरोग्य व पोषण संवर्धन

  • किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन मेळावे

  • कराड पंचायत समितीत महिला तक्रार निवारण समिती सदस्य

  • रोजगार हमी योजना (NREGA) तालुका सीआरपी

  • ग्रामविकास आराखडा प्रशिक्षण

  • आशाकिरण महिला वसतिगृहात समुपदेशन

  • लोकसहभागातून पाणी चळवळ

  • बालविवाह मुक्त भारत अभियान

  • डिजिटल साक्षरता कार्यशाळा

  • कोविड काळातील सेवाकार्य

  • महिला समुपदेशन केंद्राची उभारणी

  • समाजासाठी दिलेला वारसा…

…हीच खरी आदरांजली : सौ. मधुराणी आनंदा थोरात यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्र एक प्रेरणादायी, संवेदनशील आणि मिशनरी वृत्तीच्या नेत्या गमावल्या आहेत. त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि सुरू केलेल्या चळवळींचा प्रवास पुढे नेण, हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल.

स्मृतीस विनम्र श्रद्धांजली : सौ. मधुराणी थोरात यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी उभे केलेले आंदोलन आणि त्यांनी पेरलेली प्रेरणा… हा प्रकाश समाजातील महिलांना आणि कार्यकर्त्यांना पुढील अनेक वर्षे दिशा देत राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली…

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!