कराडमध्ये लढत, मलकापुरात समविचारींना मदत 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; काँग्रेस, आघाडी, समविचारींच्या प्रचारासाठी सभा घेणार

कराड/प्रतिनिधी: –

कराड नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित महाविकास आघाडी शक्य न झाल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून, शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी नगराध्यक्षपदासह १६ प्रभागांत उमेदवार दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचाही एक उमेदवार असून, त्यांचाही आम्ही प्रचार करणार आहोत. मलकापुरात मात्र आघाडी होऊ शकत नसल्याने तेथे काँग्रेसने निवडणूक न लढविता समविचारी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

माध्यमांशी संवाद : कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रचार सभा घेणार : श्री. चव्हाण यांनी दोन दिवस कार्यकर्त्यांशी विस्तृत चर्चा केली. काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागात जाणे शक्य नसले तरी मोठ्या सभांद्वारे प्रचाराला वेग देणार आहे. महाविकास आघाडीतील समविचारी उमेदवारांनाही आम्ही हातभार लावणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मी शिंदेंना आशीर्वादच दिले असते : मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले, शिंदे यांनी निर्णयाची कल्पना दिली असती तरी, त्यांना मी आशीर्वादच दिले असते. मला बाहेरून माहिती मिळाली; त्यांनी व्यक्तिगतरीत्या सांगितले नाही, ही खंत नक्की आहे.

राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा : मलकापूरच्या विकासात शिंदे यांच्यासह केलेल्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्याशी असलेले घरचे संबंध कायम राहतील. माझ्या कुटुंबाचे त्यांच्या कुटुंबावर नेहमीच प्रेम होते. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा कायम आहेत, असे त्यांनी सांगितले.

विकासकामे घेऊन नागरिकांसमोर जाणार : यावेळी शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीबाबत प्रयत्न होते, मात्र त्याला यश आले नाही. नगराध्यक्षपदासह 16 प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिले असून, त्यांचा प्रचार सुरू आहे. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात केलेली विकासकामे घेऊन आम्ही नागरिकांसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!