धारेश्वर यात्रेचा भक्तिमय सोहळा देवदीपावलीच्या शुभयोगात 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शुक्रवार आणि शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान, धारेश्वर येथे यंदाची कार्तिकी यात्रा आणि गुरूभंडारा देवदीपावलीच्या शुभसंयोगात उत्साहात साजरी होणार असून, संततीप्राप्तीसाठी होणारे विशेष ओटीभरण हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार असून, या संपूर्ण कार्तिकी यात्रा उत्सव सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वरचे मठाधिपती डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी केले आहे.

कार्तिक यात्रा : तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर येथे कार्तिक अमावस्येनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री धारेश्वर देवाची पारंपरिक यात्रा व गुरूभंडारा सोहळ्यांची सुरुवात आज गुरुवारी अभिषेक, बिल्वार्चन आणि महामंगलारतीने होणार आहे.

विविध विधी व ओटीभरण : आठवडाभर शिवपाठ, भजन, कीर्तन व प्रवचनांनी परिसर भक्तिमय होणार आहे. साठगाव मानकरी, पुजारी व मठाधीकारी यांच्याकडून भक्तांच्या इच्छा पूर्तीसाठी विशेषतः संततीप्राप्तीसाठी विविध विधीविधाने व ओटीभरण केले जाते.

यात्रेला विशेष : यंदा देव दीपावली शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर आणि शनिवार दि. 22 पहाटे होणारे ओटीभरण या शुभयोगामुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जन्मोत्सव व पुष्पवृष्टी : देवदीपावली निमित्त सोमवारी दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सूर्योदयावेळी 6.45 वा. वीरभद्र जन्मोत्सव व पुष्पवृष्टी होईल. दिवसभर अभिषेक-बिल्वार्चन चालणार आहे. सकाळी 10 वा. रक्तदान व सर्वरोग चिकित्सा शिबीर, 11 वा. शिवदीक्षा, दुपारी 12.30 वा. मान्यवरांचे स्वागत, सायंकाळी 5 वा. पालखी छबिना, 6 वा. दीपोत्सव, 7 वा. शिवपाठ, रात्री 8 वा. भजन-भारुडे, 11 वा. धर्मोपदेश आणि रात्री 12.36 वा. मानाची काटेपालखी काढली जाईल. पहाटे 3.45 वाजता संततीसाठी ओटीभरणाचा सोहळा होईल.

अभिषेक-बिल्वार्चन : शनिवार, दि. 22 नोव्हेंबरला सकाळी 7 वा. महापूजा-आरती, दिवसभर अभिषेक-बिल्वार्चन, तर सायंकाळी शिवपाठ व महामंगलारती होईल.

पालखी छबिना : रविवार, दि. 23 नोव्हेंबर कैलास तृतीया गुरूभंडाऱ्यानिमित्त सकाळी 10 वा. शिवदीक्षा, दुपारी 12 वा. देवपूजा व अभिषेक, दुपारी 2 वा. पालखी छबिना, महानैवेद्य अर्पण आणि दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येईल.

पाकाळणी : सोमवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी पाकाळणी महापूजा, अभिषेक-बिल्वार्चन व महामंगलारतीने यात्रोत्सवाची सांगता होईल.

महाप्रसाद : कार्यक्रमानंतर पुजारी व मानकरी मंडळींकडून सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप केला जाईल. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व यात्रा सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!