कराड उत्तर मतदारसंघातील बोगस मतदारांचा भंडाफोड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सुनील माने यांचा आरोप; मंदिर, शाळेच्या पत्त्यावर मतदार नोंदणी; उच्च न्यायालयात याचिका दाखल

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणनंतर आता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही बोगस आणि दुबार मतदार नोंदणीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत याचे पुरावे सादर करत प्रशासनावर थेट निशाणा साधला.

उच्च न्यायालयात याचिका : मंदिर, शाळा आणि कार्यालयाच्या पत्त्यावर मतदारांची नोंद केली आहे, ही लोकशाहीची क्रूर थट्टाच असल्याची टीका करत यांसंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, अविनाश माने, रमेश माने, विद्याधर बाजारे, विकास पवार, विक्रांत भोसले, सागर शेडगे, गणेश चव्हाण, धीरज माने, नीलम भोलसे आदी उपस्थित होते.

एकाच घरात विविध जाती-धर्मातील 37 मतदारांची नावे : माने म्हणाले, रहिमतपूर येथील घर क्रमांक 1860 वर प्रत्यक्षात डॉ. वसंतराव पाटील विद्यालय सुरू असून, त्याच पत्त्यावर तब्बल 19 मतदार नोंदवले आहेत. तसेच घर क्रमांक 1957 येथे हनुमान मंदिराची नोंद असताना मंदिरावर 12 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घर क्रमांक 1688 या ठिकाणी विविध जाती-धर्मातील 37 मतदारांची नावे नोंद केल्याचे निदर्शनास आले आहे. तर रहिमतपूर नगरपालिकेच्या दहा प्रभागांचा अभ्यास केला असता 617 मतदार दुबार नोंदल्याचे दिसून आले.

… ती नावे मतदार यादीतून वगळा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पारदर्शक निवडणुकीसाठी अशी नावे मतदार यादीतून वगळणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणात बीएलओ आणि निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून, ज्येष्ठ वकील असीम सरोदे हे यामध्ये काम पाहत असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

बीएलओंचे तीन ठिकाणी मतदान : दरम्यान, रहिमतपूर येथील बीएलओ ज्योती अभिजीत चव्हाण-जाधव यांनी तीन वेगवेगळ्या प्रभागात आपले नाव नोंदवून विधानसभा निवडणुकीत तीन ठिकाणी मतदान केल्याचा आरोपही माने यांनी यावेळी आहे. याबाबत प्रशासनाने कार्यवाही न करता उलट त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याबाबत माने यांनी संताप व्यक्त केला.

धरणे आंदोलनाला पाठिंबा : याप्रसंगी येथील प्रशासकीय कार्यालयात कापील (ता. कराड) येथे बोगस मतदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गणेश पवार यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा जाहीर केला. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या आंदोलनाला भेट देऊन पवार यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!