ओवी जगतापची माणुसकी सोन्याहूनही मौल्यवान 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

खेळताना सापडलेला पाच तोळे सोन्याचा अलंकार केला परत 

कराड/प्रतिनिधी : –

आजच्या स्वार्थी आणि भपकेबाज जगातही प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे, याचा जिवंत पुरावा कराडच्या ओवी सचिन जगताप हिने दिला आहे. खेळताना सापडलेला पाच तोळ्यांचा सोन्याचा हार ओवीने परत करत वयोवृत्त आजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. तिची माणुसकी सोन्याहूनही मौल्यवान ठरली.

एस.एम.एस. स्कूलची विद्यार्थिनी : माजी नगरसेवक सुहास शिवाजीराव जगताप यांची पुतणी असलेली ओवी ही एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकत आहे. तिने आपल्या कृतीतून कुटुंबीयांसह स्कूलचेही नाव उज्वल केले आहे.

अमूल्य संस्कारांचे दर्शन : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ती आपल्या आजोळी पुसेगाव (सेवागिरी) येथे गेली असताना, खेळताना तिला घराच्या मागील अंगणात अंदाजे पाच तोळ्यांचा सोन्याचा हार सापडला. एवढी लहान असूनही ओवीने क्षणाचाही विलंब न करता तो हार घरातील मोठ्यांच्या स्वाधीन केला. या कृतीतून तिची कर्तव्यदक्षता आणि कुटुंबीयांनी केलेल्या अमूल्य संस्कारांचे दर्शन घडले.

आजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू : घरच्यांनी तत्काळ सेवागिरी मंदिरात चौकशी केली असता, तो हार दर्शनासाठी आलेल्या एका परगावच्या वृद्ध आजींचा असल्याचे समजले. हरवलेला दागिना परत मिळाल्यावर त्या आजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

सत्कार व कौतुक : या प्रामाणिक कृतीबद्दल सेवागिरी मंदिर ट्रस्टतर्फे आणि उपस्थित ग्रामस्थांनी ओवीचा सत्कार करून तिच्या प्रामाणिकपणाचे मनःपूर्वक कौतुक केले.

कराड आणि पुसेगावचेही नाव उज्ज्वल : ओवीच्या या कृतीने संपूर्ण समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. एवढ्या लहान वयात इतकी मोठी मूल्ये दाखवून देत तिने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर कराड आणि पुसेगाव या दोन्ही गावांचे नाव उज्ज्वल केले आहे. ओवी जगताप हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!