भारतीय जनता पार्टी, कराड शहर आयोजित कृष्णा महोत्सव अंतर्गत आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या संकल्पनेतून ‘स्वरांजली प्रस्तुत ‘आठवणीतील गाणी : दिवाळी पहाट’ हा सुरेल कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी भाजप शहराध्यक्षा सौ. सुषमा लोखंडे, नगरसेवक सुहास जगताप, महादेव पवार, सौ. स्मिता हुलवाण, प्रशांत कुलकर्णी, दिलीप जाधव, डॉ. विशाल साळुंखे, विश्वनाथ फुटाणे, सुहास चक्के, विनायक घेवडे व अजय संसुद्दी आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक उत्सवांना नवे जीवन : प्रास्ताविकात नगरसेवक सुहास जगताप यांनी सांगितले की, कराडमध्ये पूर्वी ‘दिवाळी पहाट’ ही परंपरा होती; मात्र गेल्या सात वर्षांपासून ती खंडित झाली होती. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार ती पुन्हा सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाने शहरातील सांस्कृतिक उत्सवांना नवे जीवन मिळाले आहे.
गाण्यांचा सुंदर संगम : कार्यक्रमाची सुरुवात ‘घनश्याम सुंदरा…’ या अमर भूपाळीतील गीताने झाली. जुन्या-नव्या मराठी आणि हिंदी गाण्यांचा सुंदर संगम प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
अभंग, गझल व भावगीतांना दाद : निवेदक मनीष आपटे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने वातावरण रंगले. रणजीत हुगले यांनी सादर केलेल्या अभंग, गझल व भावगीतांना प्रेक्षकांकडून ‘वन्स मोर’च्या घोषात दाद मिळाली.
टाळ्यांचा वर्षाव : भक्ती देसाई व नितीन देसाई यांनी गायलेल्या चित्रपटगीतांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. “हाल कैसा है जनाब का…”, “चांदी जैसा रंग है तेरा…” यांसारख्या गाण्यांवर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा वर्षाव केला. रसिका झावरे यांच्या “एरी पवन…” या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर “माझे राणी माझे मोगा” या लावणीवर उपस्थितांनी मोबाईल फ्लॅशलाइटच्या उजेडात ताल धरत आनंद लुटला.
विकासनिधीचा आढावा : कार्यक्रमादरम्यान सुहास जगताप यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड शहरासाठी आणलेल्या विकासनिधीचा सविस्तर आढावा सादर केला. कार्यक्रमाचा समारोप ‘महाराष्ट्र गीत’ गाऊन करण्यात आला.
परिश्रम : या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत कुलकर्णी, अनिकेत वास्के, सागर माने, विश्वनाथ फुटाणे, रमेश मोहिते, विवेक भोसले, अभिषेक भोसले, विनायक घेवडे, सुहास चक्के, अनिल लोखंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रसिकांची ‘सुरेल सकाळ’ : एकूणच, या ‘दिवाळी पहाट कार्यक्रमाने कराडकरांच्या मनातील सांस्कृतिक ओढ जागवून रसिकांची ‘सुरेल सकाळ’ अविस्मरणीय केली.