उच्च न्यायालयाचे तातडीच्या सुनावणीचे आदेश, चौकशीसाठी संबंधितांना बोलावण्याची शक्यता
कराड/प्रतिनिधी : –
कल्याणी कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीच्या वादाला आता फौजदारी वळण मिळाले असून, कराड पोलिसांकडून चौकशीसाठी संबंधितांना लवकरच बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या वादाशी संबंधित असलेल्या विभाजन खटल्याची सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
कराड पोलिसांकडे तक्रार : सुगंधा हिरेमठ यांनी आपल्या धाकट्या भावाविरुद्ध गौरीशंकर कल्याणी, त्यांच्या पत्नी रोहिणी कल्याणी आणि एका माजी कर्मचाऱ्याविरोधात वडिलोपार्जित मालमत्ता बेकायदा हस्तांतरित केल्याचा आरोप करत कराड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, माजी कर्मचारी प्रकाश होनराव यांना चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मालमत्ता वादाचा उगम : कल्याणी कुटुंबातील मालमत्ता वादाचा उगम १९९४ मध्ये झालेल्या ‘कौटुंबिक व्यवस्थापन करारा’पासून झाला असून, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये पुणे आणि मुंबई न्यायालयांत विविध खटले प्रलंबित आहेत. या संपत्तीत कल्याणी समूहाशी निगडित समभाग, स्थावर-जंगम मालमत्ता, तसेच वडिलोपार्जित संपत्तीचा समावेश असल्याचे नमूद आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू : दरम्यान, सुलोचना कल्याणी यांच्या दोन परस्परविरोधी मृत्यूपत्रांबाबतही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, पुणे न्यायालयाने या दोन्ही अर्जांवर सुनावणी खटल्याच्या स्वरूपात घेण्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी अलीकडेच या खटल्यांची सुनावणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याने, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या ‘हायप्रोफाइल’ कौटुंबिक वादाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.