‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012’ विषयावर मार्गदर्शन
कराड/प्रतिनिधी : –
अन्यायाला कायदेशीर मार्गाने वेळीच प्रतिबंध घाला. समाजातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. भारत मोहिते यांनी केले.
कायदेविषयक मार्गदर्शन : कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल, मलकापूर येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 या विषयावर आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड न्यायालयाचे मा. न्यायाधीश उत्पात साहेब होते.
वेळीच पायबंद घाला : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक बालक सुदृढ आणि सुरक्षित वातावरणात वाढले पाहिजे, असे सांगत अॅड. मोहिते म्हणाले, पोक्सो कायद्यातील कठोर तरतुदींमुळे आरोपीस बचाव करणे अवघड झाले असून, शिक्षा होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः, आपल्या पाल्यांकडून किंवा संबंधितांकडून या कायद्याचा भंग होईल, असे वर्तन टाळले पाहिजे. बालकांवरील गुन्ह्यांना कायदेशीर मार्गाने वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे.
जबाबदार नागरिकांची भूमिका निभवा : संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच आपली कर्तव्ये पाळली नाहीत, तर गुन्ह्यांना खतपाणी मिळते. शासन, विधी सेवा प्राधिकरण आणि विविध सेवाभावी संस्था कायदेविषयक शिबिरे आयोजित करतात; त्यांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा. समाजातील नागरिकांनी गुन्ह्यांविषयी वेळेवर पोलिसांना माहिती देऊन जबाबदार नागरिक म्हणून भूमिका निभवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जागरूक करणे सर्वांची जबाबदारी : याप्रसंगी मा. न्यायाधीश उत्पात साहेब यांनी, विद्यार्थ्यांना रॅगिंग, गुड टच व बॅड टच याबद्दल अतिशय सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. कायद्याचे ज्ञान हे प्रत्येकासाठी आवश्यक असून, विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबविल्या जाणाऱ्या शिबिरांचा लाभ घेऊन इतरांनाही जागरूक करणे ही जबाबदारी सर्वांची आहे, असेही त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रिन्सिपल निकुंभ मॅडम, न्यायाधीश उत्पात साहेब, कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक थोरात उपस्थित होते.
शाळेच्या उपक्रमांची माहिती : प्रिन्सिपल निकुंभ मॅडम यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दीपक थोरात यांनी केले. स्वागत प्राची मॅडम, तर सुजाता जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी आणि आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.