ठेकेदारांच्या थकित बिलांतील गैरव्यवहाराची चौकशी करा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भरत देसाई यांची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा 

कराड/प्रतिनिधी : – 

सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या थकित बिलांच्या वितरणात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भरत देसाई यांनी केला आहे.

निवेदन : या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना लेखी निवेदन देत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तात्काळ चौकशीसह निलंबनाची मागणी केली आहे.

कर्ज व व्याजाचा ताण : भरत देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील अनेक छोट्या – मोठ्या ठेकेदारांनी शासनाच्या वर्क ऑर्डरनुसार कामे पूर्ण केली असून, त्या कामांच्या बिलांसाठी त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यांच्यावर व्याजाचा ताण वाढत असतानाही शासन स्तरावरून निधी मिळत नाही.

अन्यायकारक वागणूक : प्राप्त निधी निवडक ठेकेदारांना अदा करून इतरांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे.

ठेकेदार आत्महत्येच्या विचारात : सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांचा निधी केवळ दोन तालुक्यांमध्येच वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. इतर तालुक्यांतील ठेकेदार कर्जबाजारी होऊन मानसिक तणावाखाली आहेत. काही ठेकेदार आत्महत्येच्या विचारात असल्याची परिस्थिती गंभीर आहे.

कारवाई न केल्यास उपोषण : या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा, ठेकेदार आणि भाजप कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण छेडतील, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.

निवेदनाची प्रत : या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी सातारा यांनाही पाठविण्यात आली आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!