डॉ. राहुल फासे; श्री छत्रपती शिवाजी उद्यानात गप्पांगण कार्यक्रम उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
नेत्रदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान. मृत्यूनंतर पाच ते सहा तासांत नेत्रदान होऊ शकते. अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकते. मात्र, यासाठी फॉर्म भरून ठेवणे आणि त्याची माहिती कुटुंबीय व नातेवाईकांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कराडचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल फासे यांनी केले.
गप्पांगण : येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानात गुरुवारी झालेल्या गप्पांगण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीच्या चेअरमन सुनिताताई जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर नकाते उपस्थित होते.
भारत ‘डायबेटिसची राजधानी’ : डोळे हा शरीराचा नाजूक व महत्वाचा अवयव आहे. आज भारत ‘डायबेटिसची राजधानी’ बनला असल्याचे सांगत डॉ. फासे म्हणाले, वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाने सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. कारण अंधत्व हे कधीही, अचानक येऊ शकते. मोतीबिंदू, काचबिंदू आणि डायबेटिस ही अंधत्वाची तीन प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करून दृष्टी पुन्हा मिळू शकते. परंतु, काचबिंदूमुळे आलेले अंधत्व कायमचे असते. म्हणून नियमित तपासणी गरजेची आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
…यांमुळे पोहोचते डोळ्यांना हानी : कॉम्प्युटर, मोबाईल व लॅपटॉपच्या अतिवापरामुळेही डोळ्यांना हानी पोहोचते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “वीस मिनिटे कामानंतर वीस सेकंद विश्रांती घ्यावी, दीड फूट अंतर ठेवावे, वारंवार पापण्यांची उघडझाप करावी व झोपण्यापूर्वी डोळे स्वच्छ करावेत,” असा सल्ला डॉ. फासे यांनी दिला.
आयोजन : प्रश्नोत्तरांच्या फेरीत त्यांनी उपस्थितांचे शंकानिरसन करून गप्पांगण अधिक रंगतदार केले. या कार्यक्रमाचे आयोजन कराड नगरपरिषद, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रूप, छत्रपती शिवाजी हौसिंग सोसायटी, एनव्हायर नेचर क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हास्य क्लब, रोटरी क्लब ऑफ कराड, स्नेह संवर्धन समिती, विजय दिवस समारोह समिती आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
सेवाकार्यांचा गौरव : प्रास्ताविकात प्रा. बी. एस. खोत यांनी यांनी डॉ. फासे यांच्या जम्मू-काश्मीर व नायजेरिया येथे दहा हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया आणि ग्रामीण भागात केलेल्या प्रबोधन सेवाकार्यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
सहभाग : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त अभियंता ए. आर. पवार यांनी, तर एन. बी. शिंदे यांनी आभार मानले. गप्पांगणात जेष्ठ नागरिक, माजी नगरसेवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.